
Matheran लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेली माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून नेरळ-माथेरानदरम्यान मिनी ट्रेन सेवा १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत. दरम्यान या चार महिन्यांच्या कालावधीत अमन लॉज ते माथेरानदरम्यानची शटल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
नियमानुसार ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय
नेरळ ते माथेरान रेल्वे सुमारे २१ किलोमीटरचा घाटमार्ग असून या मार्गावर अनेक डोंगरकडे, खोल दऱ्या आणि संवेदनशील उतार आहेत. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, झाडे पडणे किंवा रेल्वे मार्गावर माती वाहून येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दरवर्षी मान्सून काळात ही सेवा तात्पुरती बंद ठेवली जाते. यंदा पावसाचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाले असले तरी मध्य रेल्वेने नियमानुसार १५ जूनपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे सोमवारपासून माथेरानची राणी सुट्टीवर असणार आहे.
शेटल सेवा नियमितपणे धावणार
पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी अमन लॉज ते माथेरान आणि माथेरान ते अमन लॉजदरम्यान शटल सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. या सेवेमुळे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना पावसाळ्यातील धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवाईने नटलेले निसर्गरम्य वातावरण आणि विविध पर्यटनस्थळांचा आनंद घेता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने जाहीर वेळापत्रकानुसार, शटल सेवा नियमितपणे धावणार असून पर्यटकांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
