
Kailash Mansarovar Yatra भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास मानसरोवर यात्रेला येत्या ३० जूनपासून सुरुवात होत असून, प्रशासनाने या प्रवासाची संपूर्ण तयारी पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यात्रेकरूंसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या प्रवासादरम्यान भाविकांना खबरदारी म्हणून १९ प्रकारची आवश्यक औषधे सोबत बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मंत्रालयाने लिपुलेख मार्गावरून प्रवास करणाऱ्या भाविकांना हलके सामान घेऊन चालण्याचा विशेष सल्ला दिला आहे. नियमांनुसार प्रत्येक भाविकाला केवळ २० किलोपर्यंतचे सामान सोबत आणण्याची परवानगी असेल, तर प्रत्येक गटाला पाच किलो प्रति भाविक या प्रमाणात सामाईक सामान नेण्याची मुभा दिली जाईल. मात्र, सामानाचे वजन २५ किलोपेक्षा जास्त आढळल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी प्रत्येक गटासोबत पाच जणांचे सेवा पथक तैनात असेल, ज्यामध्ये एक डॉक्टर आणि चार स्वयंपाकी असतील. प्रवासादरम्यान एखाद्या भाविकाची तब्येत बिघडल्यास किंवा तो पुढे प्रवास करण्यास असमर्थ असल्यास, त्याला थांबवण्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित डॉक्टरांना देण्यात आला आहे.
हेही वाचा – Pedestrian Deaths: राष्ट्रीय महामार्गांवरच सर्वाधिक पादचारी मृत्यू, ६ वर्षांत १.८ लाखांहून जास्त जणांचा बळी
या प्रवासादरम्यान भाविकांना खबरदारी म्हणून १९ प्रकारची आवश्यक औषधे सोबत बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये क्रोसिन, पॅन्टोप्राझोल, डायजीन, व्हिटॅमिन सी ५०० मिग्रॅ, इलेक्ट्रोल पावडर, डायमॉक्स, अँटिबायोटिक्स, खोकल्याचे सिरप, लिप्सॉल, बँडेज, सुती कापड, बेंझोइनचे टिंक्चर, चिकटपट्टी, बँड-एड, बेटॅडिन लोशन आणि बोरिक पावडर यांसारख्या वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे. याशिवाय होमिओपॅथी औषधे वापरणाऱ्या प्रवाशांनाही संबंधित औषधे सोबत नेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यात्रेचा पहिला गट ३० जूनला रवाना
ही वार्षिक यात्रा ३० जून रोजी सुरू होणार असून २६ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात्रेचा पहिला गट ३० जून ते ३ जुलै या कालावधीत दिल्लीमध्ये पासपोर्ट, व्हिसा आणि आवश्यक वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करेल. त्यानंतर हा गट ४ जुलै रोजी तनकपूर येथे पोहोचेल. कुमाऊँ मंडल विकास निगमचे महाव्यवस्थापक मनीष कुमार सिंह यांनी सांगितले की, मंत्रालयाने यात्रेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, यात्रेकरूंच्या निवास, भोजन आणि वाहतुकीची सर्व जबाबदारी निगम भागीदार म्हणून चोखपणे पार पाडणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
