Pune: इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अपूर्ण, संरक्षक कठडे नसतानाही अवजड वाहनांची वाहतूक सुरू

10
Pune: इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अपूर्ण, संरक्षक कठडे नसतानाही अवजड वाहनांची वाहतूक सुरू
Pune: इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अपूर्ण, संरक्षक कठडे नसतानाही अवजड वाहनांची वाहतूक सुरू

Pune: आळंदी-लोणीकंद मार्गावरील मरकळ-तुळापूरला जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अपूर्ण आहे. संरक्षक कठडे नसताना आणि अधिकृत परवानगीपूर्वीच अवजड वाहनांची धोकादायक वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आळंदी-लोणीकंद या राष्ट्रीय महामार्गावरील मरकळ-तुळापूरला जोडणारा इंद्रायणी नदीवरील जुना पूल अनेक वर्षांपासून कमकुवत झाला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील काही वर्षांपासून येथील जड-अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही. अनेक औद्योगिक कंपन्यांची वाहने धोका पत्करून याच मार्गावरून ये-जा करत होती. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाच्या वतीने याच ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे.

हेही वाचा – Noise Pollution : सण-उत्सवातील कानठळ्या बसवणाऱ्या दणदणाटावर उच्च न्यायालय टाच आणणार?

प्रत्यक्षात नवीन पुलाचे बांधकाम अजूनही सुरू आहे. पुलाला अत्यावश्यक असलेले संरक्षक कठडे बसवण्याचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाच्या संरचनात्मक स्थिरतेची (स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी) तपासणी बाकी असून, वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही. असे असतानाही, अनेक प्रकारची छोटी-मोठी आणि अवजड वाहने या पुलावरून सध्या सर्रासपणे ये-जा करत आहेत. संरक्षक कठड्यांअभावी एखादे वाहन नदीत कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे संबंधित ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलिसांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन वाहतूक थांबवणे आवश्यक बनले आहे. या भागातील बहुतांश अवजड वाहने, कंटेनर आणि ट्रॅक्टर वाहतुकीसाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर करतात. शिवाय, लोणीकंद-वाघोली-शिक्रापूरला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने स्थानिक पातळीवरील छोट्या-मोठ्या वाहतुकीची वर्दळही येथे असते. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे.

नवीन पुलाविषयी –

मंजूर निधी : ८३२.२१ लाख रुपये

पुलाची लांबी : १२० मीटर

जोडरस्त्याची लांबी : २५५ मीटर (मरकळ बाजू १२० मी., तुळापूर बाजू १३५ मी.)

कामाची मुदत : १८ महिने

बांधकाम सुरुवात : २०२२-२३

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.