Ind Vs WI T20I : सूर्याला सूर गवसला आणि अखेर भारतीय विजय साकार झाला

विंडिज बरोबरच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवला

150
Ind Vs WI T20I : सूर्याला सूर गवसला आणि अखेर भारतीय विजय साकार झाला
Ind Vs WI T20I : सूर्याला सूर गवसला आणि अखेर भारतीय विजय साकार झाला
  • ऋजुता लुकतुके

विंडिज बरोबरच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवला. उपकर्णधार सूर्यकुमार यादवच्या ८३ धावा आणि त्याला तिलक वर्माने नाबाद ४९ करत दिलेली साथ यामुळे भारतीय विजय शक्य झाला. गयानाच्या जॉर्जटाऊन मैदानावर भारत आणि विंडिज यांच्या दरम्यान तिसरा टी-२० सामना सुरू झाला तेव्हा खेळपट्टीवर असलेल्या तगड्यांची चर्चा समालोचन कक्षात सुरू होती. कारण, एकाच खेळपट्टीवर हा सलग दुसरा सामना होत होता. आणि मैदान त्यामुळे जास्त कोरडं आणि भेगांनी भरलेलं होतं.

त्यामुळे रोव्हमन पॉवेल आणि हार्दिक पांड्या हे दोन्ही कर्णधार मैदानावर उतरले तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्धार करतच. अशा खेळपट्टीवर १५० धावाही पुरेशा होतील, असा दोघांचा होरा होता. प्रत्यक्षात नाणेफेकीचा पहिला डाव पॉवेल म्हणजे पर्यायाने विंडिज संघाने जिंकला. थोडाफार पावसाचाही अंदाज होता. त्यामुळे नाणेफेक जिंकून विंडिजने निम्मी लढाई जिंकल्यासारखं होतं. त्यातच ब्रँडन किंग आणि काईल मेयर्स यांनी अर्धशतकी सुरुवात संघाला करून दिली. तेव्हा वाटलं हा ही सामना भारताच्या हातून निसटेल कदाचित. पण, अक्षर पटेलने मेयर्सचा (२५) अडसर दूर केला. आणि पाठोपाठ कुलदीप यादवने जॉनसन चार्ल्सला पायचीत पकडलं. पुढे त्यानेच एका षटकात जम बसलेला किंग (४२) आणि धोकादायक वाटणारा निकोलस पुरन (२०) यांना बाद केलं आणि तिथे भारताने पहिल्यांदा सामन्यातील आपलं अस्तित्व दाखवून दिलं.

फिरकीला खेळणं विंडिज फलंदाजांना कठीण जात होतं. आणि दीडशेचं लक्ष्य दूर जात होतं. पण, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांची १२ षटकं खेळून झाल्यावर कर्णधार रोव्हमन पॉवेलनं भारतीय तेज गोलंदाजांच्या चेंडूवर पटापट धावा वसूल केल्या आणि १९ चेंडूत ४० धावांवर नाबाद राहात विंडिजलाही ५ बाद १५९ अशी समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. भारताने अखेर या सामन्यात यशस्वी जयसवालला संधी दिली. पण, तो झटपट बाद झाला. दुसरा सलामीवीर शुभमन गिलही ६ धावांवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. आणि भारताची अवस्था २ बाद ३४ अशी झाली.

आजचा दिवस सूर्यकुमार यादवचा

तोपर्यंत मैदानावर रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली होती. आणि त्यामुळे चेंडूही थोडा निसरडा झाला आणि चेंडू नीट बॅटवर बसायला लागला. तसा तो बसला नसता तरी सूर्यकुमार यादव आज वेगळ्याच मूडमध्ये होता. पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार ठोकला. आणि पुढेही मैदानात चौफेर फटकेबाजी त्याने सुरूच ठेवली. तो मैदानात असे पर्यंत भारताने षटकामागे चक्क १० धावांची सरासरी ठेवली होती.

तो संघाच्या १२१ धावा झाल्या असताना बाद झाला तेव्हा त्याच्या वैयक्तिक धावा होत्या ८३! त्याचा स्ट्राईट रेट होता १८९ धावांचा. आणि ५४ चेंडूंमध्ये त्याने ४ षटकार आणि १० चौकार लगावले. अलझारी जोसेफच्या एका चेंडूवर ब्रँडन किंगकडे झेल देऊन तो बाद झाला तो फटका तसा कमनशिबीच होता. या इनिंग दरम्यान सूर्यकुमारने काही महत्वाचे टप्पेही पार केले. टी-२० क्रिकेटमध्ये सूर्याच्या १,७५० धावा झाल्या आहेत. आणि विराट कोहली, रोहीत शर्माच्या खालोखाल तो भारताचा तिसरा यशस्वी टी-२० फलंदाज ठरला आहे. तर टी-२० सामन्यांमध्ये त्याने तब्बल १०१ षटकार लगावले आहेत. त्या यादीत तो जगात तिसऱ्या स्थानावर आहे. सूर्यकुमार सारख्या फलंदाजाला सूर गवसल्यामुळे या मालिकेतही भारतीय संघाला आता आशा निर्माण झाल्या आहेत.

(हेही वाचा – Wheat : तांदळानंतर आता गव्हाची दरवाढ; किंमती सहा महिन्यांच्या उच्चांकावर)

सूर्याला साथ तिलक वर्माची

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात. या हंगामात दोघंही चांगल्या फॉर्ममध्ये होते. तिलक वर्माला या मालिकेत संधी मिळाली ती आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावरच. आणि त्याने सूर्याला आज चांगली साथ दिली. ४९ धावांवर तो नाबाद राहिला. मालिकेतील सलग दुसरं अर्धशतक हुकलं. पण, भारतीय विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. ३७ चेंडूंमध्ये ४९ धावा करताना त्याने १ षटकार आणि ६ चौकार लगावले. या मालिकेत १६० धावांसह तो भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे.

शिवाय सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आशिया चषक तसंच एकदिवसीय विश्वचषकातही त्याने मधल्या फळीसाठी आपली दावेदारी उभी केली आहे. भारताला मधल्या फळीतील चांगल्या फलंदाजांची प्रतीक्षा आहे. एल के राहुल आणि श्रेयस अय्यर तंदुरुस्त होतील अशी आशा आहे. पण, तरीही तिलक वर्माने त्यांच्यासमोरही स्पर्धा उभी केली आहे. कारण, तिलक डावखुरा फलंदाज आहे. आणि ईशान किशन, रवी जाडेजा यांचा अपवाद वगळला तर सध्या भारताकडे तगडा डावखुरा फलंदाज नाही.

संघात उजव्या आणि डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्यांचं चांगलं मिश्रण असेल तर ते चांगलंच उपयोगी पडतं. त्यामुळे तिलक वर्माची दावेदारी मजबूत आहे. पण, तो पुढचा भाग झाला. सध्या तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवमुळे भारताने तिसरा टी-२० सामना ७ गडी राखून आरामात जिंकला आहे. आणि येत्या शनिवारी तसंच रविवारी शेवटचे दोन सामने फ्लोरिडाला होणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.