- दादासाहेब दापोलीकर
जगामध्ये मजबूत दगडांच्या भिंतीसुद्धा धुळीस मिळतात. गडकोटांचे मजबूत तटसुद्धा कधी ना कधी तडकून तुटतात. (भावार्थ-तर या कारागृहाचे काय! ते कधी ना कधी नाश पावणारच आहे.) यमयातना भोगत असलेला तो स्थितप्रज्ञ तपस्वी त्याच्या चिरतरुण मनामध्ये केवढा मोठा प्रखर आशावाद बाळगून होता हे त्यांच्या अंदमानच्या कारागारातून लिहिलेल्या अनेक कवितांमधून दिसते. त्या कणखर मनाला पुढील अनंतकाल कणखर ठेवण्यासाठी स्वातंत्र्यवीर अशा प्रकारच्या कविता सतत लिहीत राहायचे. याचाच अर्थ काव्य आणि क्रांती सावरकरांच्या (Veer Savarkar) व्यक्तिमत्त्वाचे दोन अविभाज्य घटक होते. काव्याचा उपयोग क्रांतीसाठी, यातना झेलण्यास मन खंबीर व्हावे यासाठी आणि क्रांतीच्या वातावरणाचा मनावर क्रांतिकारी परिणाम होऊन त्यातून पुन्हा असे नवे भव्य दिव्य क्रांतिकारी काव्य!! असे हे काव्य आणि क्रांती यांचे अद्भुत अद्वैत सावरकरांच्या ठायी निवसत होते.
सावरकरांच्या मनात क्रांती आणि काव्य यांचा उगम लहानपणीच झाला. कवितेची आवड वडिलांमुळे निर्माण झाली. वडील कविता करत आणि तात्यारावांना नवनीतातील आख्याने, वेचे वाचून दाखवत असत. घरी अनेक पोथ्या पुराणे असत. विनायक हे सारे वाचत असे. वयाच्या आठव्या वर्षीच इवल्या विनायकाच्या मनात कवी श्रीधर रचित हरिविजय वगैरे पोथ्यांप्रमाणे आपणही एक महाकाव्य किंवा ग्रंथ लिहिला पाहिजे असे आले! केवढी मोठी गोष्ट! ज्या वयात मुले भातुकलीचे, लुटूपुटूचे खेळ खेळत असतात, त्या वयात हे बाळ महाकाव्य, ग्रंथ लिहायचे विचार मनात बाळगत होते! विचाराची अंमलबजावणी लगेच सुरू झाली. काडेपेटीच्या आकाराच्या कागदाचे तुकडे एकत्र करून त्याचे पुस्तक बनवून त्यावर ‘श्री गणेशाय नमः’ लिहिण्यापर्यंत त्यांनी प्रयत्न झाला. अर्थात तो ग्रंथ कधीही लिहून पूर्ण झाला नाही. तरीपण त्या कोवळ्या वयापासूनच स्वातंत्र्यवीर ओव्या, आर्या, फटके वगैरे लिहू लागले होते.
सावरकरांची पहिली ठाऊक असलेली मोठी कविता म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लिहिलेला फटका ‘श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग’. त्यानंतर १८९८ च्या आसपास अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी गोदावरी नदीवर मोरोपंतांच्या गंगावकिलीप्रमाणे लिहिलेले ‘गोदावकिली’ हे दीर्घ काव्य आणि पुण्याच्या जगद्धितेच्छू वर्तमानपत्रात छापून आलेला ‘स्वदेशीचा फटका’! भगूरमधील सावरकर (Veer Savarkar) हे पहिलेच गावकरी होते की ज्यांची कविता पुण्यातील वर्तमानपत्रात छापून आली होती. त्यावेळी तो मोठा चमत्कारच होता. तात्यारावांच्याच शब्दात सांगायचे, तर या वर्तमानपत्राच्या कर्त्यांना या कवितेच्या कर्त्याचे वय माहित नव्हते. कवीचे वय जर बारा वर्षे आहे हे त्यांना कळले असते तर त्यांनी कदाचित ही कविता छापली नसती!
याच काळापासून स्वातंत्र्यवीरांच्या मनात सशस्त्र क्रांतीचे विचार येऊ लागले. १८९४ ते ९५च्या आसपास झालेल्या मुंबई-पुण्यातील हिंदू- मुसलमानांच्या दंगलींच्या बातम्या स्वातंत्र्यवीरांची धर्मनिष्ठा अधिक तीव्र करण्यास कारणीभूत ठरल्या. मुसलमान दंगे करतात आणि हिंदू बहुतांशी वेळा चूक बसतात याचे सावरकरांना मोठे वैषम्य वाटे. बालवयात या राष्ट्रीय अपमानाचा बदला त्यांनी जवळच्याच वापरात नसलेल्या एका प्रार्थनास्थळावर लुटूपुटूचा हल्ला करून घेतला. अशी ही एक गंमतीची आठवण त्यांनी लिहून ठेवली आहे. सावरकरांच्या (Veer Savarkar) मनामध्ये काव्य आणि क्रांतीची ज्वाला अशी जवळजवळ एकाच वेळी प्रज्वलित झाली होती, हेच यावरून दिसून येते!
आर्य बंधू हो उठा उठा का मठासारखे नटा सदा
हटा सोडुनी कटा करू या म्लेंच्छपटा ना धरू कदा!
असे प्रज्वलंत भाषेतील काव्य स्वातंत्र्यवीरांनी केवळ कविता करायची म्हणून लिहिले नाही तर त्यातून त्यांना स्वदेशीच्या क्रांतीचा संदेश पोहोचवायचा होता! त्यानंतर ‘चाफेकर आणि रानडे यांच्यावरील फटका’ १८९९ मध्ये तर, ‘टिळक स्तवन’, ‘श्री शिवगीत’ ही काव्ये १९०० मध्ये लिहिली गेली. १९०२ मध्ये त्यांनी ‘शिवाजी महाराजांची आरती’ आणि ‘विश्वात आजवरी शाश्वत काय झाले’ ही अजरामर गीते लिहिली. १९ वय असलेल्या मुलाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांची आरती लिहिण्याची कल्पना यावी ही कल्पनाच अकल्पनीय आहे.
जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्यां ताराया
आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला !
सद्गदिता भूमाता दे तुज हांकेला
करूणारव भेदुनि तव हृदय न कां गेला?
क्रमश :
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

