Veer Savarkar : ‘त्या’ मंडनमिश्राची ‘बंडखोराची’ कोठडी

93
Veer Savarkar : ‘त्या’ मंडनमिश्राची ‘बंडखोराची’ कोठडी
Veer Savarkar : ‘त्या’ मंडनमिश्राची ‘बंडखोराची’ कोठडी
  • मंजिरी मराठे

वीर सावरकर ‘मरणोन्मुख शय्येवरून’ उठल्यानंतर त्यांना सेल्युलर कारागृहातील (Cellular Jail) पाच क्रमांकाच्या त्रितल चाळीतील तिसऱ्या मजल्यावर काही दिवस एकांतवासात ठेवण्यात आलं.

आठ एक वर्षांनंतर त्यांना पहिल्यांदाच अशी कोठडी मिळाली होती जिथून अथांग सागर आणि आकाशाचं दर्शन होत होतं. चाळीच्या बाहेर असलेल्या सोप्यात काही काळ त्यांना पाय मोकळे करता येत होते. देखणं रॉस बेट, समोरचा देखावा पाहताना त्यांच्या डोक्यात विचारांचं काहूर उठत असे. सावरकर लिहितात, “कारागारात एकांताच्या अतिरेकाने मन इतके अंतर्मुख होते की त्यास बळाने बाहेर ढकलावे तरी बहिर्मुख होत नाही. बाहेरच्या गोष्टींत गुंगण्याची सवय सुटून जाते. तेच ते जुने विचार घोळीत बसण्याची भंगड सवय त्यास लागते. त्यातही अशक्ततेमुळे वाचन अशक्य झालेले; तिथे गंभीर विचारांचे आणि ध्यानधारणादिक अभ्यासाचे नावच नको. त्या समोरच्या समुद्राकडे बघता बघता आणि त्याच्या त्या लाटांप्रमाणे चित्तवृत्तींच्या लाटांस एकीतएक विलीन करता करता केव्हा झपकन मन त्या समुद्राच्याच खोलीप्रमाणे कोण्या गंभीर खोलीत नाहीसे होऊन चित्त एकाएकी ध्यानस्थ व्हावे. कधी त्या समुद्रात, कोंदणात हिरकणीसारख्या शोभणाऱ्या त्या लहान ‘रास’ बेटाच्या मध्ये उंच उभारलेले ते चर्च आणि आकाशाकडे एखाद्या अंगुलीप्रमाणे संबोधन करीत राहिलेले शिखर पाहत मन एकाएकी तसेच एकाग्र होऊन आकाशातील त्या परम पित्याच्या स्मृतस्पर्शाने मुग्ध व्हावे; पण ती गंभीर एकाग्रता वा त्या विशाल मुग्धतेचा तो एकांतिक उमाळा त्या अशक्त आणि तांतविक दुर्बलतेने पंगू झालेल्या चित्तास आणि मज्जास सहन होऊ नये. अशा ध्यानानंतर वा विचारांचा ओघ ओसरताच डोके दुखू लागावे, मज्जास आणि ज्ञानतंतूस ताण पडल्यासारखे वाटून दुर्बळता विशेषच वाटू लागावी; म्हणून तो आनंदही पारखा झाला. अशा वेळी भगवान बुद्धाची आठवण व्हावी. त्या उपासानंतर आलेल्या मूर्च्छनेतून उठताच ध्यानशक्ती, शारीरिक शक्ती त्यास प्रथम संपादन करावी लागली. खडीसाखर, लोण्याचा गोळा, खीर, जे मार्गाने मिळत गेले ते तोंडात टाकून प्रथम उपासाने क्षीण झालेला देह स्थूल करावा लागला! मग इतरांची काय कथा!

(हेही वाचा – Andheri Fire News : क्रिस्टल पॉइंट मॉलच्या कार पार्किंगला भीषण आग; व्हिडिओ व्हायरल )

अशा स्थितीत वाचन वर्ज्य, विचार वर्ज्य, ध्यान वर्ज्य, धारण वर्ज्य, आणि गंभीरता अशक्ततेने वर्ज्य, तर सलीलता कारागारीय क्रूरतेने वर्ज्य, संगत नाही, सेाबत नाही, फिरणे नाही, खेळणे नाही”, अशा वेळी केवळ समोर दिसणाऱ्या तिथल्या डॉक्टरच्या दारातल्या कोंबड्या, घुंगरुटं आणि तिथे दिसणारे पक्षी पाहून त्यांच्या मनाला क्षणिक विरंगुळा वाटत असे.

कावळेही त्यांच्या परिचयाचे झाले होते. तिथे एकदा सावरकरांच्या संमतीनं एका मुसलमान बंदीवानानं गुप्तपणे कावळा पाळला होता. पण त्या कावळ्याचा ब्रह्मी लोक भाजीसारखा उपयोग करणार हे दोन-चार दिवसांतच सावरकरांच्या (Veer Savarkar) लक्षात आलं. त्या कारागारात वर्षानुवर्ष मांस खायला न मिळाल्यामुळे काही ब्रह्मी लोक आणि काही मुसलमान कावळे धरून मारून ते मांस आगीवर शिजवून खात असत. त्या मांसाच्या बदल्यात एखाद्या आण्याची देवाणघेवाण किंवा तंबाखूची विक्रीही चाले. त्या मुसलमान बंदीवानानं तेवढ्यासाठीच तो कावळा पाळला होता आणि सावरकरांना हे लक्षात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या कावळ्याची भाजीही होऊन त्यानं काही बंदीवानांचा जठराग्नी शांत केला होता.

ती त्या मंडनमिश्राची कोठडी

सावरकर (Veer Savarkar) लिहितात, “तिथे मिळणाऱ्या एका सुखाची आठवण न काढणे केवळ कृतघ्नपणा होईल. ते सुख म्हणजे त्या बुलबुलांच्या करमणुकीचे काय ते. अंदमानी बुलबुल सुरेख असतात. चिमुकले, रेखीव, चपळ! आणि ते त्यांचे सुंदर स्वर! खेळकर तरी किती. त्यांचे थवेचे थवे त्या खोबऱ्यावर तुटून पडावयाचे आणि माझ्या चाळीसमोर किलबिल किलबिल करीत असावयाचे.. त्यांची आणि मैनांची भाषा देखील मला कळू लागली. मैनांच्या भाषेतले निरनिराळे दहा-पंधरा स्वर म्हणजे शब्द तरी मी अगदी बरोबर ओळखी.. त्यांची साधी बोलावणी, लपंडावांच्या आरंभाची भाषा, निकडीची बोलावणी, भयसूचना, सुखगीती, रतिभीती, शिशुगीती, पिलांस बोलावणे, प्रियकरांस बोलावणे, युद्धापूर्वीची अंतिमोत्तरे (Ultimatums) आव्हाने, रणगर्जना इत्यादी प्रसंगांचे निरनिराळे स्वर आणि शब्द अगदी भाषेसारखे ठराविक असत. आणि त्या भाषेच्या व्याकरणात मी अगदी व्युत्पन्न [समृद्ध] झालो होतो. माझी भाषा त्यांना मला शिकवणे शक्य नव्हते; कारण पक्षी पाळणे हा कारागारीय अपराध असे. नाहीतर ते माझ्या खोलीत सहज पाळले जाते. जर मला तसे करता येते तर मी त्यांस राष्ट्रप्रीतीची गाणी शिकविली असती. आणि मग शंकराचार्य, मंडनमिश्राचे घर कोणते म्हणून विचारीत गेले तेव्हा जसे लोकांनी अभिमानाने सांगितले, “ज्याच्या दारापुढें पोपट आणि मैना वेदान्ताचा वाद करीत असतात,‘जानीहि तन्मंडनमिश्रगेहं’[ते मंडनमिश्राचं घर]. त्याचप्रमाणे माझ्या कोठडीविषयीही चौकशी करीत एखादा नवीन बुलबुल आला असता, जुन्या बुलबुलांनी त्याला सांगितले असते, जिच्या गजाशी मैना आणि बुलबुल हिंदुस्थानची स्वातंत्र्यगीते गात असतात “जानीहि तन्बंडनमिश्रकक्षं” – ती त्या मंडनमिश्राची, बंडखोराची, कोठडी होय!” शरीर व्याधींनी जर्जर झालेलं असो, कुठलीही भीषण परिस्थिती असो, मनात सहस्रावधी विचारांचं तांडव सुरु असो, वीर सावरकरांच्या मनात सदैव विचार असे तो अतीव प्रिय मातृभूमीचा, तिच्या स्वातंत्र्याचा आणि म्हणूनच पोपट, मैनांना सुद्धा स्वातंत्र्यगीतं शिकवण्याची कल्पना ते करतात.

(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.