Teacher : गुरुवर्य बनले ‘इन्फ्लुएन्सर्स’ आणि सुरु झाला ‘धंदा’

80
Teacher : गुरुवर्य बनले ‘इन्फ्लुएन्सर्स’ आणि सुरु झाला ‘धंदा’
Teacher : गुरुवर्य बनले ‘इन्फ्लुएन्सर्स’ आणि सुरु झाला ‘धंदा’
  • साक्षी कार्लेकर

एकेकाळी ‘गुरु साक्षात परब्रह्म’ मानली जाणारी गुरु-शिष्य परंपरा आता ‘लाईक्स’, ‘शेअर्स’ आणि ‘सबस्क्राईब’च्या चक्रव्यूहात अडकली आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली सध्या युट्युबवर जो काही तमाशा सुरू आहे, तो पाहिल्यास एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो, आपण आपल्या मुलांना सुशिक्षित करत आहोत की त्यांना एका वैचारिक गुलामगिरीच्या आणि प्रक्षोभक संस्कृतीच्या खाईत ढकलत आहोत?

युट्युबवर सध्या अशा शिक्षकांचा सुळसुळाट झाला आहे ज्यांना पुस्तकातील ज्ञानापेक्षा कॅमेऱ्यासमोर सादरीकरण कसं करायचं यात जास्त रस आहे. हे शिक्षक आता शिक्षक (Teacher) राहिले नसून ‘इन्फ्लुएन्सर्स’ झाले आहेत. अभ्यासाच्या मुद्द्यांवर १० मिनिटे बोलले तर उरलेली २० मिनिटे हे लोक राजकीय भाष्य, वैयक्तिक टीका आणि प्रक्षोभक विधाने करण्यात घालवतात. कारण साधं आहे, युट्युबचा अल्गोरिदम. शांतपणे शिकवणाऱ्या शिक्षकाला किंमत नाही; पण ज्याच्या बोलण्यात ठिणगी आहे, जो कुणावर तरी तोंडसुख घेतोय आणि जो ‘ट्रेंडिंग’ विषयावर वादग्रस्त विधान करतोय, त्यालाच व्ह्यूज मिळतात. या ‘कोचिंग माफियांनी’ शिक्षणाचा बाजार (Education Business) मांडला आहे. फळीवर खडूने गणित सोडवण्यापेक्षा, फाटलेल्या जीन्स घालून इकडेतिकडे उड्या मारणे, तावातावाने ओरडणे आणि स्वतःची एक ‘ब्रँड इमेज’ तयार करणे याला प्राधान्य दिले जात आहे. हे विद्यार्थी घडवत नसून, स्वतःचे भक्त निर्माण करत आहेत. त्या विद्यार्थ्यांना जाऊन बघा ज्यांच्या पालकांनी त्यांच्या शिक्षणासाठी आपली जमीन गहाण ठेवली आहे, एखाद्या आईने तिच्या बांगड्या आणि दागिने गहाण ठेवले आहेत. काही पालकांनी कर्ज काढले आहे, आणि ते अजूनही कर्जाचे हप्ते फेडत आहेत. त्यांचे मूल त्यांना गरिबीच्या या दलदलीतून बाहेर काढेल, या आशेवर ते जगतात. पण हे इन्फ्लुएन्सर्स (Influencers) मुलांना विद्यार्थी नव्हे तर सबस्क्राइबर्स बनवत आहेत.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या युरोप दौऱ्याचा फ्रान्समधून शानदार प्रारंभ; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत शिखर परिषदेचे उद्घाटन)

आम्ही तुमच्या मुलांकडून एक रुपयाही घेणार नाही, आमचे शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अशा घोषणांचा पाऊस पडतो तेव्हा पालकांना वाटते की कोणीतरी साक्षात देव विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी धावून आला आहे. पण या मोफत शब्दाच्या पडद्यामागे लपलेला गलिच्छ आर्थिक व्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा होणारा लिलाव अत्यंत भयावह आहे. ज्यांना आपण नि:स्वार्थी शिक्षक समजतो, ते प्रत्यक्षात करोडो रुपयांच्या ‘व्ह्यूज’च्या धंद्यात गुंतलेले व्यावसायिक आहेत. सर्वसामान्यांना वाटते की युट्युबवर व्हिडिओ टाकून कितीसे पैसे मिळत असतील? पण याचं वास्तव डोळे पांढरे करणारं आहे. युट्युबच्या अर्थशास्त्रात (YouTube Economics) प्रत्येक विषयाला वेगळी किंमत असते. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, फायनान्स आणि तंत्रज्ञान यांच्यानंतर शैक्षणिक आशय सर्वाधिक कमाई करून देतो. एका अंदाजानुसार, शैक्षणिक व्हिडिओंना प्रति १००० व्ह्यूजमागे ८० ते १८० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. याउलट बातम्यांच्या व्हिडिओंना केवळ ५० ते १२० रुपये मिळतात. आता विचार करा, ज्या शिक्षकाच्या एका व्हिडिओला १ कोटी (१० मिलियन) व्ह्यूज मिळतात, तो शिक्षक केवळ एका व्हिडिओतून ८ ते १८ लाख रुपये खिशात घालतो. हे उत्पन्न कोणत्याही मोठ्या कॉर्पोरेट कंपनीच्या सीईओच्या पगारापेक्षाही जास्त आहे. जेव्हा एखाद्या व्हिडिओतून एका रात्रीत १० लाख रुपये मिळणार असतात, तेव्हा तिथं ‘शिक्षण’ दुय्यम ठरतं आणि ‘टीआरपी’ मुख्य होतो. या शिक्षकांना पुस्तकातील संकल्पना स्पष्ट करण्यात रस नसून, व्हिडिओ ‘व्हायरल’ कसा होईल यात जास्त रस असतो. या संदर्भात कायम चर्चेत असणारे ‘खान सर’ यांचे उदाहरण पाहू. खान सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीचे लाखो चाहते आहेत, यात शंका नाही. क्लिष्ट विषय सोप्या भाषेत सांगण्याची त्यांची हातोटी आहेच परंतु, अनेकदा त्यांच्या व्हिडिओंमध्ये वापरली जाणारी भाषा, गरज नसताना केलेली वादग्रस्त विधाने यातून काय साध्य करायचे असते हा देखील प्रश्न आहेच. जेव्हा एखादा शिक्षक व्यासपीठावरून द्वेषमूलक किंवा वादग्रस्त विधान करतो, तेव्हा त्याचे समर्थन करणारे लाखो तरुण तयार होतात. हे तरुण तर्क विसरून केवळ आपल्या आवडत्या सरांनी सांगितले म्हणून ते खरे मानू लागतात. खान सर प्रकरणातून हेच समोर आले की, शिक्षण आता केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते ‘ब्रेन वॉशिंग’चे साधन बनले आहे. एखादा शिक्षक जेव्हा वर्गात किंवा कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ करतो किंवा आक्रमक अंगविक्षेप करतो, तेव्हा त्याला धाडसी शिक्षक (Teacher) म्हणून गौरवले जाते. पण हा कोणता आदर्श आपण पुढच्या पिढीसमोर ठेवत आहोत?

युट्युबला शांत शिक्षक (Teacher) नको आहेत, त्याला ‘ऍक्टिव्ह’ आणि ‘लाऊड’ लोक हवे आहेत. पुस्तकातील धड्यापेक्षा ‘आज देशात काय चाललंय?’ यावर चवदार चर्चा करून विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवले जाते. जास्त व्ह्यूज म्हणजे जास्त जाहिराती आणि जास्त पैसा. या नादात शिक्षणाची गुणवत्ता रसातळाला गेली आहे. प्रामाणिकपणे शिकवणारे जुन्या पिढीतील शिक्षक आजही युट्युबवर व्हिडिओ टाकत आहेत, पण त्यांचे व्ह्यूज हजारांच्या घरातही जात नाहीत. कारण त्यांच्याकडे ‘मसाला’ नाही. समाजाची ही शोकांतिका आहे की आपल्याला ‘ज्ञान’ देणाऱ्यापेक्षा ‘मनोरंजन’ करणारा शिक्षक (Teacher) अधिक जवळचा वाटू लागला आहे. वेळ आली आहे की, समाजाने आणि विशेषतः पालकांनी विचार करावा की, आपण आपल्या पाल्याला कोणाच्या हवाली करत आहोत. केवळ ‘फॉलोअर्स’ जास्त आहेत म्हणून तो चांगला शिक्षक ठरत नाही. शिक्षणाचा दर्जा हा त्याच्या सादरीकरणावरून नाही, तर त्याने दिलेल्या मूल्यांवरून ठरवला पाहिजे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.