कांजूरमार्ग Police Station वर १३ व्या मजल्यावरून कोसळला २०० किलोचा लोखंडी खांब; चौघांवर गुन्हा दाखल

13
AI जनरेटेड इमेज

Police Station : कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या आवारातील तडीपार विभागाच्या कार्यालयावर लगतच्या एका खासगी बांधकाम प्रकल्पावरून थेट २०० किलो वजनाचा अजस्र लोखंडी खांब कोसळल्याची थरारक घटना शुक्रवारी दुपारी घडली.सुदैवाने हा खांब दारासमोरील झाडावर आणि छताच्या पत्र्यांवर आदळल्यामुळे कार्यालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जीव थोडक्यात वाचला. या प्रकरणी बांधकाम करणाऱ्या विकासक कंपनीचे कंत्राटदार, अभियंता आणि सुरक्षा पर्यवेक्षकांसह चौघांविरुद्ध कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांजूरमार्ग (पूर्व) येथील पोलीस ठाण्याच्या तडीपार विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) विश्वास दशरथ देसाई (वय ५६) शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास आपल्या कार्यालयात संगणकावर काम करत होते.त्यावेळी पोलीस ठाण्याच्या कार्यालयाला लागूनच ‘कॅम्स रियल्टर’ (Cams Realtor) या डेव्हलपरच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. अचानक ‘धडाम’ असा प्रचंड आवाज झाल्याने देसाई यांनी तत्काळ बाहेर येऊन पाहिले.

(हेही वाचा – LICच्या गुंतवणुकीत मोठा घोटाळा? अनिल अंबानींसह रिलायन्स कॅपिटलविरोधात CBIचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? )

शेजारील बांधकामाच्या थेट १३ व्या मजल्यावरून अंदाजे २०० किलो वजनाचा लोखंडी खांब खाली पडला होता. हा खांब कार्यालयाच्या दरवाजासमोरील झाडावर आणि छताच्या पत्र्यांवर आदळून पडला होता.या धडकेमुळे कार्यालयाच्या छताचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने दारात कोणीही उपस्थित नसल्यामुळे जीवितहानी टळला. बांधकामाच्या ठिकाणाहून यापूर्वीही पोलीस ठाण्याच्या आवारात लहान-मोठे दगड, खडी व सळया पडत असल्याच्या घटना घडल्या होत्या. यासंदर्भात पोलिसांनी संबंधित कंत्राटदाराला सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत वेळोवेळी सूचनाही दिल्या होत्या, तरीही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सुरक्षेची कोणतीही योग्य खबरदारी न बाळगता नागरिकांच्या व पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी कंत्राटदार मितेश जैन, साईट इंजिनिअर धनराज रामचंद्र जगताप, तसेच सेफ्टी सुपरवायझर विक्रम व सोहेल मिर्झा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२५, २९०, ३२४(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब एकनाथ गर्जे करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.