IIT Bombay : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने शुक्रवारी संध्याकाळी वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, संशयितांची चौकशी सुरू केली आहे. गेल्या सहा महिन्यांतील पवई कॅम्पसमधील ही तिसरी आत्महत्या असल्याने संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मूळचा यवतमाळचा असलेला साहिल हा ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात शिकत होता. शुक्रवारी परीक्षेदरम्यान उत्तरे मिळवण्यासाठी प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर (ChatGPT) अपलोड करताना त्याला पकडण्यात आले होते. या घटनेनंतर प्राध्यापक व विभागप्रमुखांनी त्याचे समुपदेशन केले आणि त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दिलासा दिला होता, असा दावा आयआयटी प्रशासनाने केला आहे. या चर्चेनंतर तो वसतिगृहातील खोलीत परतला, जिथे संध्याकाळी तो मृतावस्थेत आढळला.
(हेही वाचा – Tirupati लाडू प्रसादातील भेसळ प्रकरणाला गंभीर वळण; ‘ईडी’कडून प्रमुख सूत्रधाराला अटक! )
दरम्यान, साहिलच्या पालकांनी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाचा दावा फेटाळून लावला आहे. साहिलवर तीव्र मानसिक दबाव आणला गेला होता आणि त्याला एक वर्षासाठी निलंबित करून वसतिगृह सोडण्याची धमकी देण्यात आली होती, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या मते, याच दबावातून आणि कारवाईच्या भीतीतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
साहिलच्या आईने ही आत्महत्या नसून मानसिक छळातून झालेली हत्या असल्याचा आरोप केला आहे. तर त्याचे वडील रवींद्र वाकोडे यांनी या घटनेमागे जातीयवाद आणि संस्थात्मक छळ असल्याचा आरोप करत, जोपर्यंत जबाबदार व्यक्तींवर अटकेची कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेऊन कॅम्पस सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. या घटनेमुळे शनिवारी दिवसभर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली.
आयआयटी मुंबई प्रशासनाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, या प्रकरणाची संबंधित यंत्रणांमार्फत सखोल चौकशी सुरू असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. पोलीस सध्या वडिलांनी तक्रारीत नमूद केलेल्या सर्व व्यक्तींची कसून चौकशी करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

