-
जयेश मेस्त्री
जून २०२६ रोजी नरेंद्र मोदींनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नेहरुंचा ४३९८ दिवसांचा विक्रम मोडला. त्यामुळे स्वाभाविकपणे जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) आणि नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची तुलना सुरू झाली आहे. मोदी समर्थकांनी मोदी नेहरुंपेक्षा किती सक्षम आहेत हे सांगायला सुरुवात केली तर नेहरु समर्थक नेहरुंच्या सगळ्या राजकीय आणि घोडचुका पदरात घालू लागले. नेहरु यांची कार्यशैली पाहिली तर त्यांना ‘हिंदू’ या शब्दाची जणू काही ‘शिषारी’ वाटत होती. नेहरुंनी भारतीय संस्कृतीच्या हिंदू पैलूंना जाणूनबुजून दुर्लक्षित केले. त्यांच्या काळात, भारताच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक धोरणांमध्ये हिंदू परंपरा आणि मूल्यांना दुय्यम स्थान देण्यात आले, ज्यामुळे हिंदू भावविश्वाचे खच्चीकरण झाले. नेहरुंच्या छत्रछायेखाली वाढलेल्या कॉंग्रेसने हिंदुंना आतंकवादी ठरवले, हे भारतीय राजकारणातील एक कटू सत्य आहे. ‘भगवा आतंकवाद’ यासारख्या शब्दांचा वापर करून त्यांनी हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम लांगुलचालन करून हिंदुंना त्यांच्याच देशात एकटे पाडले. अल्पसंख्याकांच्या मतांसाठी बहुसंख्याक समाजाच्या भावनांचा चुराडा केला, त्यांच्या श्रद्धास्थानांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले.
मात्र भल्याभल्या नेत्यांना जे जमलं नाही, ते नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) करून दाखवलं. त्यांनी हिंदुंमधील राजकीय आत्मविश्वास जागवला आणि एक मजबूत ‘हिंदू वोट बॅंक’ तयार केली. नरेंद्र मोदींनी हिंदू अस्मितेला पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रवाहात आणले आहे. विशेष म्हणजे मोदींनी नेहरुंप्रमाणे स्वतःला कधीही ‘भारतरत्न’ दिले नाही आणि कधी देणारही नाहीत, हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावे लागेल. उलट मोदींची प्रतिमा जागतिक स्तरावर मिळालेल्या सन्मानामुळे उजळली आहे. जगाने त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवले आहे. दुसरी गोष्ट नरेंद्र मोदींचे नातेवाईक राजकारणात नाहीत. मोदींचा वारसदार मोदी नावाची व्यक्ती नसणार. ही बाब नेहरुंच्या कार्यपद्धतीपेक्षा वेगळी आहे. नेहरुंनी मात्र कुटुंब योजना चालवली. आजही कॉंग्रेसवर त्यांच्याच कुटुंबाची सत्ता आहे आणि या कुटुंबाला भारतवार राज्य करायचं आहे. पण आता ते शक्य होणार नाही… असो.
(हेही वाचा – Dombivli : डोंबिवलीकरांची डोकेदुखी संपणार; रेतीबंदर रेल्वे फाटकावरील बहुप्रतीक्षित चार पदरी उड्डाणपुलाला मंजुरी!)
कॉंग्रेसच्या हिंदू विरोधी धोरणांमुळे हिंदू समाजात एक प्रकारची राजकीय उदासीनता आणि उपेक्षा निर्माण झाली. संख्या मोठी असूनही, ती मतांमध्ये परावर्तित होत नव्हती, कारण त्यांना आपले प्रतिनिधित्व करणारे कोणी दिसत नव्हते. म्हणूनच बाळासाहेब ठाकरेंनाही त्यांच्या सभेला होणाऱ्या प्रचंड गर्दीला पाहून म्हणावे लागले होते की, ‘ही इतकी गर्दी मतदानाच्या वेळी कुठे जाते?’ हे वाक्य हिंदू समाजाच्या राजकीय उदासीनतेचे आणि विखुरलेपणाचे प्रतीक होते. हिंदू समाज एकवटला नाही, तर त्याची राजकीय ताकद शून्य ठरते, हेच यातून अधोरेखित होत होते. मोदींनी हिंदुंना विश्वास दिला. हिंदू वोट बॅंक तयार केली. ही वोट बॅंक केवळ संख्येवर आधारित नसून, ती हिंदू अस्मिता, संस्कृती, राष्ट्रवाद आणि विकासाच्या धाग्यांनी अत्यंत मजबूतपणे विणलेली आहे. मोदींनी हिंदू समाजाला हे पटवून दिले की, संख्या ही हिंदुंची ताकद आहेच, पण ती विखुरली असेल तर ती कमजोरी होईल. म्हणून हिंदूंची एकजूट आवश्यक आहे.
कुणी कितीही नाकारलं तरी आज भारतात एक विशिष्ट हिंदू वोट बॅंक तयार झाली आहे, जी कोणत्याही राजकीय पक्षाला दुर्लक्षित करणे परवडणारी नाही. या वोट बॅंकेकडे दुर्लक्ष केल्यास काय होतं, हे नुकतंच बंगालमध्ये आपण पाहिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने हिंदू मतांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या (BJP) वाढत्या प्रभावाने हे सिद्ध झालं आहे की, हिंदू मतांना गृहीत धरणे आता शक्य नाही. ही हिंदू वोट बॅंक तोडण्याचा प्रयत्न अनेक पुरोगामी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवादी करत आहेत. हिंदुंना पुन्हा सेक्युलरिज्मकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आज हिंदू जागा झालाय. त्याला आपल्या राजकीय शक्तीची जाणीव झाली आहे. त्याला आता केवळ धार्मिक ओळखच नाही, तर राजकीय ओळखही मिळाली आहे. हिंदुंनी राजकीयदृष्ट्या जागृत व्हावं याबाबतचा प्रचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) खूप आधी केला होता. त्यांच्या दूरदृष्टीला आज यश लाभले आहे. सावरकरांनी मांडलेले हिंदुत्वाचे विचार, हिंदू समाजाच्या एकजुटीची कल्पना आणि राष्ट्रवादाचे तत्वज्ञान आज प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. याचे श्रेय निश्चितपणे नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) दिलेच पाहिजे. त्यांनी सावरकरांच्या विचारांना आधुनिक राजकीय व्यासपीठावर आणले आणि त्यांना जनमानसात रुजवले. मोदींनी केवळ हिंदू मतांना एकत्र आणले नाही, तर त्यांना एक दिशा दिली, एक आवाज दिला. या बदलामुळे भारताच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. आता भारतात हिंदू अस्मिता आणि राष्ट्रवाद हे महत्त्वाचे घटक बनले आहेत. मोदींनी हे सिद्ध केले आहे की, जर हिंदू समाज एकत्र आला, तर तो कोणतेही राजकीय समीकरण बदलू शकतो आणि देशाच्या भविष्याची दिशा ठरवू शकतो. त्यामुळे मोदी आणि नेहरुंची तुलना करताना हिंदुत्वाचा विचार व्हायला हवा. नेहरुंनी हिंदुंना नाकारुन राजकारण केले. तर मोदींनी हिंदुंना आलिंगन देऊन राजकारण केले. हा या दोन नेत्यांमधला महत्त्वाचा फरक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

