Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या मैदानाचा घोळ कायम, पावसात पाण्याचा निचरा न झाल्यामुळे मैदानात तळं

10
Asian Games 2026
Asian Games 2026
  • ऋजुता लुकतुके

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने सुरू असतानाच मैदानाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारताच्या महिला संघाचा उपांत्य सामना होण्यापूर्वी नागोया येथील कोरोगी क्रीडा उद्यानातील क्रिकेट मैदानाच्या परिसरात पाणी साचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खेळाडू आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मैदानाच्या काही भागांतून ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

भारताच्या महिला संघाने याच मैदानावर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट मोहिमेला शानदार सुरुवात केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताने यजमान जपानचा आठ गडी राखून पराभव केला. जपानचा डाव अवघ्या ५७ धावांत संपुष्टात आणल्यानंतर भारताने केवळ पाच षटकांत लक्ष्य गाठले. आता भारताचा सामना रविवारी बांगलादेशविरुद्ध उपांत्य फेरीत होणार आहे.

(हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi : वैभव सुर्यवंशीला अजून प्रतीक्षा करावी लागणार; गंभीरने केली भूमिका स्पष्ट )

मात्र, या सामन्यापूर्वी मैदानाच्या परिस्थितीमुळे चिंता वाढली आहे. मैदानाच्या सीमारेषेजवळील काही भागांत पाणी साचले असून, त्यामुळे परिसरात हालचाल करणे कठीण झाले आहे. याआधीही या मैदानावर पावसाचा परिणाम दिसून आला होता. बांगलादेश आणि चीन यांच्यातील उपांत्यपूर्व सामना पाणी साचल्यामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. चांगल्या हवामानानंतरही मैदान खेळासाठी योग्य स्थितीत आणता आले नव्हते.

या सामन्यात बांगलादेशला चांगल्या क्रमवारीचा फायदा देत उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. पाकिस्तान आणि थायलंड यांच्यातील सामन्यालाही मैदानाच्या ओलाव्यामुळे तब्बल ९० मिनिटांचा विलंब झाला आणि सामना ११ षटकांचा करण्यात आला. त्यामुळे कोरोगी मैदानाच्या पाण्याचा निचरा आणि मैदान सुकवण्याची व्यवस्था याकडे आता विशेष लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी नागोयामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. काही खेळाडूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले होते, तर काही क्रीडा स्थळांवर पाणी गळतीच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. आता क्रिकेट मैदानाच्या परिस्थितीमुळे आयोजन व्यवस्थेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या कोरोगी क्रीडा उद्यानात आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी योग्य नैसर्गिक गवताची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. स्पर्धेपूर्वी झालेल्या चाचणी स्पर्धेत मैदानाच्या स्थितीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. मात्र, मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आयोजकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.