सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती लळीत यांचा मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार

94

राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसह शिवसेना नक्की कुणाची, शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कुणाचे यासंबंधी सर्व याचिका प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत यांनी याकरता ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठ स्थापन केले आहे. २७ सप्टेंबर रोजी यावर निवाडा होणार आहे. अशातच न्यायमूर्ती लळीत यांचा शनिवारी, १० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्याच्या अर्थसंकल्पात सध्या एक टक्केपेक्षा थोडी कमी तरतूद विधि व न्यायसाठी असून ती वाढवून एक टक्क्यांपर्यंत आणण्याचा देखील मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे व लवकरच त्याबाबतीत निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हॉटेल ताज पॅलेसच्या क्रिस्टल हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय लळीत, झुमा दत्ता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांची उपस्थिती होती. मुंबई उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती उपस्थित होते.

सतत स्वतःला विकसित करा – उदय लळीत

आपल्या सत्काराला उत्तर देताना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी त्यांच्या कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईपासून करिअरची सुरुवात करून आज सरन्यायाधीश म्हणून मुंबईत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारताना मला कृतज्ञ वाटते आहे असे सांगून उदय लळीत म्हणाले की, वकील व्यवसायात सतत स्वतःला विकसित करणे व सुधारणा करीत राहणे हीच या व्यवसायाची खासियत आहे. सर्वोच्च न्यायालय ही माझी मातृसंस्था आणि कर्मभूमी आहे. माझ्या क्षमतेनुसार मी सर्वोच्च न्यायालयात काम केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.