Mumbai Nalesafai : मुंबईची तुंबई होण्यापासून रोखण्याचे महापालिका आयुक्तांसमोर आव्हान 

660
Mumbai Nalesafai : मुंबईची तुंबई होण्यापासून रोखण्याचे महापालिका आयुक्तांसमोर आव्हान 
Mumbai Nalesafai : मुंबईची तुंबई होण्यापासून रोखण्याचे महापालिका आयुक्तांसमोर आव्हान 
  • सचिन धानजी

हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा नालेसफाई (Mumbai Nalesafai) योग्यप्रकारे न झाल्यास मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील दोन वर्षांमध्ये पाऊस हा थांबून थांबून लागल्याने त्याचा परिणाम जाणवला नाही. परंतु यंदाच्या पावसाळ्यात ही शक्यता कमीच असून जर सलग मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईत २६ जुलै सदृश्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

२६ जुलैचा धसका 

मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, मुंबईची तुंबई होऊ नये, रस्ते जलमय होऊ नयेत यासाठी पावसाळ्यापूर्वी योग्य प्रकारे नालेसफाई (Mumbai Nalesafai) होणे हे आवश्यक असते. २६ जुलै च्या महापुरापासून आपण सातत्याने पावसाचा धसका घेत आलोय. मुंबई महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कितीही उपाययोजना केल्या आणि त्यासाठी करोडो रुपये ओतले तरी मुंबईकरांचा महापालिकेच्या कामांवर जराही विश्वास नाही, ही वस्तूस्थिती आहे.

(हेही वाचा – Uddhav Thackeray: सिंधुदुर्गतील सभेत राणेंना डिवचत उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर निशाणा)

कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया 

खरं तर २६ जुलैच्या महापुरानंतर मुंबईची तुंबई होऊ लागली असे नाही. तर त्या आधीही मुंबईची तुंबई होत होती, हे विसरून चालणार नाही. मुंबईत तासाला ५० मिमी पाऊस पडला तरी पाणी तुंबणार नाही, अशाप्रकारे पावसाळी पाणी वाहून नेण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली. तसेच २६ जुलैच्या महापुरानंतर मुंबईतील सर्व नाले व नद्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने डॉ. माधव चितळे समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार घेतला. परंतु १७ ते १८ वर्षांमध्ये नाले आणि नद्यांचे रुंदीकरण पूर्ण झालेलं नाही. मिठी नदीचा २५ टक्के पट्टा आजही अतिक्रमित आहे. त्यावरील अतिक्रमणं काढली जात नाहीत. त्यामुळे नदीचे काही भागांत रुंदीकरण झालेले नाही तर काही भागांमध्ये याचे काम न झाल्याने त्यातील पाणी योग्यप्रकारे आणि पूर्ण क्षमतेने वाहून जात नाही. जर ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आणि चितळे समितीच्या शिफारशींनुसार ही कामे यापूर्वीच झाली असती तर १२०० कोटींचा खर्च ५ हजारांवर जावून पोहोचला नसता. परंतु तिप्पट ते चौपट खर्चात वाढ होऊन मुंबईची तुंबई सुरुच आहे. पुराच्या पाण्याचा धोका आजही मुंबईकरांच्या मनात घर करून बसलेला आहे. २००५चा महापुरानंतर आज १८ ते १९ वर्षांनंतरही तीच परिस्थिती असेल तर त्यावर आतापर्यंत केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च हा या पुराच्या पाण्यातच वाहून गेला असेच म्हणावे लागेल.

(हेही वाचा – Yavatmal Accident: यवतमाळमध्ये वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी)

अनेक नाले अद्याप अस्वच्छच 

२००५ ते २०१० पर्यंत मुंबईतील नालेसफाईच्या (Mumbai Nalesafai) कामांवर जिथे वार्षिक १७ ते १८ कोटी रुपये खर्च व्हायचे तिथे आता नालेसफाईच्या कामांवर तब्बल २५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. म्हणजे १२ ते १३ पटीने नालेसफाईचा खर्च वाढत गेला आहे. पण यंदा हवामान खात्याच्या अंदाज लक्षात घेता प्रशासनाला कोणत्याही प्रकारची हयगय करून चालणार नाही. त्यामुळे नालेसफाईचे काम योग्यप्रकारे करताना रस्त्यालगतच्या नाल्यांची सफाई योग्य प्रकारे करण्यावर भर दिला पाहिजे. आज मुंबईतील नालेसफाईचे काम हे सरासरी ५० टक्क्यांपर्यंत झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु अनेक नाल्यांना हातही लावला गेलेला नाही. त्यामुळे सफाई ही आकडेवारीपुरतीच नसावी तर प्रत्यक्षात नाल्यातील गाळातून दिसली पाहिजे.

छोट्या आणि मोठ्या नाल्यांची सफाई करण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात पाणी तुंबल्यास दोन्ही यंत्रणा एकमेकांवर बोट दाखवून मोकळ्या होतात, हा अनुभव आहे. त्यामुळे सर्वप्रथम दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय असायलाच हवा. परंतु मोठ्या व छोट्या नाल्यांची सफाई करताना रस्त्यालगतचे पेटी नाले किंवा ढापा ड्रेन यांच्या सफाईकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण रस्त्यावरील पाणी या पेटीका नाल्यातून जावून छोट्या नाल्यांना आणि तिथून मोठ्या नाल्यांना मिळते. त्यामुळे जर रस्त्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचाच निचरा योग्यप्रकारे होणार नसेल तर मोठ्या नाल्यांच्या सफाईला अर्थच काय असा प्रश्न उपस्थित होतो.

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : शाहू महाराज स्वत:हून वारसदार म्हणवतात; राजवर्धनसिंह कदमबांडेंचं टीकास्र)

तिन्ही अधिकारी नवीन, अनुभव तोकडा पडण्याची शक्यता  

आज अनेक मोठ्या नाल्यांचे रुंदीकरण झालेले आहे, पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपिंग स्टेशन कार्यरत आहेत, रस्त्यावरील साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सुमारे ३०० पंप अतिरिक्त बसवले जातात, असे असूनही जर पाणी तुंबणार असेल महापालिकेच्या यंत्रणेच्या नियोजनात त्रुटी आहेत, अशी शंका निर्माण होते. मुळात हिंदमाता आणि मिलन सबवेच्या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्यावर उतारा म्हणून मोठ्या टाक्या बांधून त्या टाकीत साचलेले पाणी पंप केले जाते आणि ओहोटीच्यावेळी त्या टाकीतील पाणी समुद्रात सोडले जाते. या टाकीचा काही प्रमाणात दिलासा आहे. पण आजवर पाऊसच थांबून थांबून लागल्यामुळे महापालिकेची सर्व कामे यशस्वी झाली असाच दावा केला जातो, जेव्हा सलग दोन ते तीन तास मुसळधार पाऊस पडेल तेव्हाच ही कामे यशस्वी झाली किंवा नाही हे समजेल.

पावसाळ्यासाठीच्या सर्व उपाययोजनांसह महापालिका सज्ज आहे, असा दावा केला जात असला तरी महापालिकेचे नेतृत्व अननुभवी आहे. आज महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी हे तिन्ही अधिकारी नवीन आहेत. आता प्रत्यक्ष भेटी देऊन ते मुंबईची भौगोलिक परिस्थितीसह प्रकल्प आणि कामांची माहिती घेत आहेत. पण भविष्यात मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यास आणि त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचे नियोजन कसे करावे इथे मात्र अनुभव तोकडा पडण्याची शक्यता आहे. खरं तर सनदी अधिकारी हे कोणत्याही विषयाचं ज्ञान अवगत करण्यात पारंगत असतात किंबहुना कोणताही विषय ते चुटकी सरशी समजून घेत त्यावर आपले मत बनवून निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे हे तिन्ही अधिकारी नवीन जरी असले तरी येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी परिस्थिती अभ्यासून यावर मात करतील यात शंका नाही.

(हेही वाचा – Nagpur Banner: नागपूरमध्ये मतदारांचा टक्का घसरला, रस्त्यांवर लावले बॅनर्स)

आयुक्त गगराणी यांना अभ्यासाची गरज 

यापूर्वीचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल हे बिनधास्त होते. तत्कालिन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यामुळे ते बिनधास्त असायचे. वेलरासू हे अनुभवी असल्याने तसेच प्रत्येक विभागाची आणि पाणी कुठे तुंबते याची खडानखडा माहिती ते ठेवत असल्याने ते संबंधित विभागाचे प्रमुख अभियंते हे जरी नवीन असले तरी त्यांना सोबत घेऊन ते त्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करायचे. परंतु आता पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंते हेही नवीन आहेत. मात्र त्यांचे तिन्ही उपप्रमुख अभियंते हे अनुभवी असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. सध्या प्रशासक असल्याने महापालिकेचा कारभार हा राज्य शासनाच्या अधिपत्याखाली होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मुंबईतील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर आयुक्त म्हणूनच उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे गगराणी यांना ही माहिती देताना मुंबईची परिस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील सर्व ठिकाणांचा सर्वप्रथम अभ्यास करावा लागेल. जेणेकरून भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना या समस्येचे मुळ लक्षात येईल आणि याबाबतच्या उपाययोजना आखण्यासही संबंधित विभागाला निर्देश देण्यात ते यशस्वी ठरतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.