- कल्याण : प्रतिनिधी
Everest : अशक्य वाटणारी स्वप्ने जिद्दीच्या आणि धैर्याच्या जोरावर पूर्ण करता येतात, याचा प्रत्यय कल्याणकर असलेल्या गृहिणी नयना बोऱ्हाडे (Nayana Borhade) यांनी करून दिला आहे. समुद्र सपाटीपासून १७ हजार ५९८ फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पचा (EBC) खडतर ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करून कल्याण-डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
(हेही वाचा – Indigo Flight चे एमर्जन्सी लँडिंग; पायलटच्या ‘त्या’ कृतीमुळे होत आहे कौतुक; नेमकं काय घडलं ?)
आंबेगावच्या लेकीची हिमालयात भरारी
पुणे जिल्ह्यातील (Pune District) आंबेगाव तालुक्याच्या कानसे गावचे दिवंगत सामाजिक कार्यकर्ते रोहिदास आमोंडकर यांची कन्या नयना बोऱ्हाडे या कल्याणच्या लोकग्राममध्ये स्थायिक आहेत. गृहिणी असल्या तरी त्या अल्ट्रा सायकलिस्ट, रनर आणि ट्रेकर म्हणूनही ओळखल्या जातात. साहसाची आवड आणि पर्वतांप्रती असलेले प्रेम जपत त्यांनी यापूर्वी आपला पन्नासावा वाढदिवसही अनोख्या पद्धतीने साजरा केला होता. सह्याद्रीतील तब्बल पन्नास ट्रेक पूर्ण करत त्यांनी आयुष्याच्या पन्नासाव्या वर्षाचे स्वागत केले होते. आता एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करून नयना बोऱ्हाडे यांनी आपल्या साहसी प्रवासात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे.

लुकलापासून बेस कॅम्पपर्यंतचा खडतर प्रवास
ही मोहीम नेपाळमधील (Nepal) लुकला येथून सुरू झाली. नामचे बाजार, तेंगबोचे, डिंगबोचे, लोबुचे, गोरक्षेप या हिमालयीन भागातील कठीण आणि आव्हानात्मक मार्गांवरून प्रवास करत त्यांनी अखेर जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टच्या (Mount Everest) पायथ्याशी असलेल्या बेस कॅम्पवर मजल मारली. या ट्रेकदरम्यान कमी ऑक्सिजन, उणे तापमान, अवघड चढाई, प्रचंड थकवा आणि सतत बदलणारे हवामान अशा अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले. मात्र प्रबळ इच्छाशक्ती, नियमित सराव आणि मानसिक ताकदीच्या जोरावर नयना बोऱ्हाडे यांनी अवघ्या आठ दिवसांत हा प्रवास पूर्ण केला.
पर्वत जिंकायचे नसतात…अनुभवायचे असतात
या अनुभवाबद्दल बोलताना नयना बोऱ्हाडे म्हणाल्या, हिमालयातील भव्य पर्वतरांगा, रंगीबेरंगी प्रेअर फ्लॅग्ज, बर्फाच्छादित वाटा, याकांचे तांडे आणि पोर्टर्सची अथक मेहनत हा अनुभव आयुष्यभर स्मरणात राहील. एव्हरेस्ट बेस कॅम्प हा फक्त ट्रेक नसून स्वतःला नव्याने ओळखण्याचा प्रवास आहे. पर्वत जिंकायचे नसतात, तर त्यांच्यासोबत चालायचे आणि अनुभवायचे असते.

द अल्पिनिस्ट क्लबच्या मार्गदर्शनासह टीमचा सहभाग
हा खडतर ट्रेक त्यांनी पुण्यातील द अल्पिनिस्ट क्लब या संस्थेमार्फत पूर्ण केला. या मोहिमेसाठी नयना बोऱ्हाडे यांना दोन वेळा एव्हरेस्ट (Everest) सर करणारे एव्हरेस्टर भगवान चावले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या मोहिमेत नयना यांच्यासोबत सांगलीच्या प्रीती फडके, अंजली पित्रे, पीएसआय सुशीला खांडवी, सारंग पित्रे, पीएसआय चंद्रकांत खांडवी, प्रवीण पाटील, उमेश, राजेश टोळ, देवा, महेश आणि केतन या गिर्यारोहकांचाही सहभाग होता. या सर्वांनी मिळून हा अवघड ट्रेक यशस्वी केला. सामान्य आयुष्यातील जबाबदाऱ्या सांभाळत नयना बोऱ्हाडे यांनी एवढ्या उंचीवरील साहसी मोहीम यशस्वी केल्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह आंबेगाव तालुक्यातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. नयना यांच्या या यशामुळे महिलांसह तरूणांना साहसी क्षेत्रात पाऊल टाकण्याची प्रेरणा मिळत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

