शिवप्रेमींच्या विरोधानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर येणार…

90

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ७ डिसेंबर रोजी स्वराज्याची राजधानी रायगडला भेट देणार आहेत. यावेळी त्यांचं हेलिकॉप्टर होळीच्या माळावर उतरणार होते. मात्र याला शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र त्यानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारल्यानंतर ७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत.

पर्यटकांसाठीची रोप-वेची सुविधाही बंद

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी आजूबाजूच्या परिसरातील पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. यावेळी पर्यटकांसाठीची रोप-वेची सुविधाही बंद ठेवण्यात आली आहे. प्रशासनाने पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी आधीच याबाबतचे आदेश जारी केले आहे. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रायगडावर तयारीची लगबग सुरू असून संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगीताराजे यांनी रायगड किल्ल्यावरील तयारीची पाहणी केली.

रायगड पर्यटकांसाठी राहणार बंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबरला किल्ले रायगडला भेट देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत किल्ला आणि रोपवेदेखील पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. हा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

सोशल मीडियावर शिवप्रेमींकडून विरोध

(हेही वाचा – ….म्हणून दुर्गराज रायगडावर पाच दिवस पर्यटकांना बंदी!)

राष्ट्रपती महोदयांच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही पण किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे. यासह सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रपतींचे हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे, मात्र यावरून सोशल मीडियावर शिवप्रेमींकडून विरोध दर्शविला जात असून संताप व्यक्त केला जात आहे.

२५ वर्षांनंतर शिवरायांच्या अवमान

यापूर्वी रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिपॅड होते. या ठिकाणी हॅलिकॉप्टर उतरताना तसेच उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धूळ, माती, केर कचरा उडतो. ही धूळ, माती होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने १९९६ ला येथे उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढून टाकण्यात आला होता. सुमारे २५ वर्षांनंतर शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत असल्याने शिवप्रेमींकडून विरोध केला जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.