डोंबिवलीतील स्वागतयात्रेत स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था घेणार सहभाग  

85

गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाच्या निमित्ताने राज्यभर ठिकठिकाणी स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये डोंबिवली येथील स्वागतयात्रा लक्षणीय असते. या स्वागतयात्रेत यंदाच्या वर्षी प्रथमच स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था (अं.नि.वि.वि.) डोंबिवली शाखा सहभागी होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांशी निगडित असलेली डोंबिवलीतील संस्था स्वागतयात्रेत सहभागी होत असल्याची ही पहिलीच वेळ आहे.

या स्वागतयात्रेत महिला आणि पुरुष पांढर्‍या पोषाखात सकाळी ठीक 6 वाजता द्वारका हॉटेल, डोंबिवली पश्चिम येथे जमणार आहेत. त्यावेळी सर्वांना फेटे बांधण्यात येणार आहेत. सकाळी 6:45 वाजता भागशाळा मैदानातून ही स्वागतयात्रा मार्गस्थ होणार आहे. या यात्रेत सहभागी संस्थेच्या कार्यकर्त्यांना शेले देखील परिधान करण्यास देण्यात येणार आहेत. या वेळी संस्थेच्या रथावर काही लहान मुले स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा पेहेराव करणार आहेत. तसेच काही जण भारत मातेचा पेहराव करणार आहेत. याप्रसंगी वीर सावरकरांची अजरामर गीते लावण्यात येणार आहेत. रथामागे घोषणांबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे फलक हाती घेऊन काही कार्यकर्ते चालणार आहेत. त्यामाध्यमातून विज्ञाननिष्ठ सावरकर, हिंदुत्ववादी सावरकर, देशरक्षक सावरकर, राष्ट्रकवी सावरकर आणि समाजसुधारक सावरकर अशी वीर सावरकर यांची विविधांगी ओळख स्पष्ट होईल. काही महिला काही महत्त्वाच्या चौकात वीर सावरकरांच्या एका गीतावर झेंडा नृत्य करणार आहेत. ठीक 11 वाजता गणपती मंदिर, फडके रोड येथे यात्रेची सांगता होईल, अशी माहिती स्वातंत्रवीर सामाजिक संस्था (अं.नि.वि.वि.) डोंबिवली शहर प्रमुख मंगेश वसंत राजवाडे यांनी दिली.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.