बापरे…देशभरातील नामांकित विद्यापीठांच्या प्रमाणपत्रांची व्हायची विक्री…

118

विविध राज्यातील नामांकीत विद्यापीठे, शिक्षण संस्था यांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रे यांची लाखो रुपयांत विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून या दोघांकडून विविध राज्यातील तब्बल २०० गुणपत्रिका आणि छपाईसाठी लागणारी सामुग्री जप्त केली आहे. ही कारवाई बोरिवली पूर्वेतील संजय गांधी नॅशनल पार्क या ठिकाणी करण्यात आली आहे.

ऑनलाइन पैसे घ्यायचे

बोरिवली पूर्वेकडील नॅशनल पार्क समोर असलेल्या प्राईम सफायर एज्युकेशन या कार्यालयातील दोन व्यक्तींनी एका विद्यार्थ्याकडून १ लाख ३१ हजार रुपये घेतले. त्याबदल्यात हे दोघे त्याला गुजरात येथील साबरमती विद्यापीठ आणि मध्यप्रदेश येथील डॉ. ए. पी. जे कलाम विद्यापीठातील मागील वर्षीच्या पदवीच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र देणार होते. अशा प्रकारे गरजू विद्यार्थ्यांकडून रोख आणि ऑनलाइन स्वरूपात पैसे स्वीकारून विविध विद्यापीठांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र यांची विक्री केली जात असल्याची माहिती सहायक निरीक्षक भरत घोणे यांना मिळाली.

(हेही वाचा अरे बापरे! सफाई कर्मचाऱ्याने टोचले बाळाला इंजेक्शन, बाळाचा मृत्यु)

डझनभर राज्यांतील विद्यापीठांचे बनावट प्रमाणपत्रे विकली

प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ११ च्या पथकाने प्राईम सफायर एज्युकेशनच्या कार्यालयात छापा टाकला. प्रितेश जैन (३४) आणि रविप्रकाश मोर्या (२६) हे दोघे बनावट प्रमाणपत्र बनवून विक्री करीत असल्याचे आढळून आले. कार्यालयाची झाडाझडती घेतली असता या ठिकाणी २०० विद्यार्थ्यांच्या बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र आढळली. याचबरोबर लॅपटॉप, दोन हार्ड डिस्क, एक लाखाची रोख रक्कम, पेनड्राइव्ह तसेच इतर कागदपत्र सापडल्याची माहिती पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिली. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, जयपूर, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, छत्तीसगढ या राज्यातील विद्यापीठांची बनावट प्रमाणपत्र विकण्यात आल्याचे समोर आले आहे.

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सहभागाची शक्यता

बनावट प्रमाणपत्र बरोबरच ही टोळी जुन्या वर्षातील हजेरी देखील विद्यार्थ्यांना लावून देत होती. काही विद्यापीठांमध्ये एक दिवसांसाठी नेऊन त्यांनी विद्यार्थ्यांकडून एकाच दिवसात तीन वर्षांचे पेपर सोडून घेतल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. यामुळे या रॅकेटमध्ये काही एजंट तसेच वेगवेगळ्या विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान प्रितेश आणि रविप्रकाश या दोघांची न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.