मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात चांदीवाल आयोगाकडून 50 हजार रुपयांचे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. हे वॉरंट जामीनपात्र आहे. तसंच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हे वॉरंट देण्यासाठी नियुक्ती करावी, असे आदेश आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत.
चौकशीसाठी हजर न राहिल्याने कारवाई
या अगोदर देखील परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगानं चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्यावेळी सिंह चौकशीला गैरहजर राहिले. मात्र, जेव्हा आयोगाकडून शेवटची सुनावणी झाली तेव्हा आयोगानं कठोर भूमिका घेतली आणि सांगितले होते की, जर पुढील सुनावणीला सिंह हजर झाले नाहीत तर त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात येईल. मंगळवारी परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगासमोर हजर रहायचं होतं. मात्र ते हजर राहिले नाहीत त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचाः राज्यात ईडीच्या वाढत्या कारवायांवर काय म्हणाले शरद पवार? वाचा…)
परमबीर सिंह यांचे अनिल देशमुख यांच्यावर आरोप
सचिन वाझे प्रकरणात बदलीच्या कारवाईनंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी उद्धव ठाकरे आणि पोलिस महासंचालक यांना पत्र लिहून, अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप लावले होते. उच्च न्यायालयात या प्रकरणी एक याचिका दाखल झाली होती. त्यानुसार सीबीआयद्वारे चौकशीचे आदेश देखील देण्यात आले होते. राज्य सरकारनं देखील सेवानिवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची समांतर चौकशी करत आहे.
Join Our WhatsApp Community