२१व्या शतकातील खिलाफत चळवळ आणि ‘खलिफा’!

भारतातील धर्मांध, विघटनवादी, फुटीरतावादी भारतीय मुसलमानांसाठी पाकिस्तान हा २१व्या शतकातील एक प्रकारचा 'खलिफा'च बनला आहे, असे म्हटले तर अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही.

112

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अत्यंत खोलवर दुष्परिणाम घडवून आणलेला चुकीचा प्रयोग म्हणजे खिलाफत चळवळ! पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस तुर्की नेता केमाल पाशाने खलिफाला हटवून तुर्कस्तानची सत्तासूत्रे हातात घेतली. तुर्कस्तानातील मुस्लिम एकमुखाने त्याच्या पाठिशी होते. अर्थात ब्रिटीशांचा या सत्तांतराला पूर्ण पाठिंबा होता. खलिफा हा संपूर्ण जगातील मुस्लिमांचा प्रमुख मानला जात असला तरीही खिलाफत बरखास्त होऊन केमाल पाशा तुर्कस्तानचा अध्यक्ष बनला. या घटनेत तत्कालीन मुस्लिम जगाला, ज्यात अरबस्थानाचा समावेश होता, काहीही स्वारस्य नव्हते. केवळ भारतीय मुस्लिमांचा याला विरोध होता. हे सत्तांतर तुर्की जनतेच्या पाठिंब्याने झाले असल्याने खरेतर हा पूर्णत: त्यांचा अंतर्गत मामला होता. तसा हा विषय भारतापासून निराळा होता. भारतातील मुसलमान तुर्कस्तानातील खलिफाशी दुरान्वयेही संबंध ठेवत नव्हते. पण मोहनचंद करमचंद गांधी यांनी त्याचा संबंध मारून मुटकून भारतीय मुसलमानांशी जोडला आणि भारतात खिलाफत चळवळ सुरु केली. भारतातील मुसलमानांना तुर्कस्थानातील खलिफासाठी रस्त्यावर उतरवले. नुसते मुसलमानांनाच नव्हे, तर हिंदूंनाही मुसलमानांसोबत रस्त्यावर आणले. त्यातून भारतामधील मुसलमानांमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य राहिले दूर, उलट भारतातील मुसलमानांच्या मनात ‘आपल्यासाठीही स्वतःचे असे स्वतंत्र राष्ट्र असावे’, अशी भावना निर्माण झाली. ३१ ऑगस्ट १९२० रोजी भारतात खिलाफत चळवळीला प्रारंभ झाला, आज त्या घटनेला १०१ वर्षे पूर्ण होत आहेत.

पाकिस्तान भारतीय मुसलमानांसाठी ‘खलिफा’च!

त्याच्यासाठी राष्ट्र हे दुय्यम असून इस्लाम हाच सर्वश्रेष्ठ आहे, अशी भावना निर्माण झाली. परिणामी भारतात अनेक ठिकाणी खिलाफत आंदोलनाचे रुपांतर जिहादमध्ये होऊन हिंदूंविरुद्ध दंगली सुरु झाल्या. केरळमधील मोपला हत्याकांडात तर मानवी क्रौर्याची परिसीमा ओलांडली गेली. हजारो हिंदूंची हत्या, स्त्रियांवर सामूहिक बलात्कार आणि अगणित हिंदूंची धर्मांतरे झाली. गर्भवती स्त्रियांच्या पोटातील गर्भ त्यांचे पोट फाडून  बाहेर फेकण्यात आले. तेथील विहिरी आणि तळी मृतदेहांनी भरली होती.

पुढे याच मानसिकतेचे पर्यावसान हे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीच भारतातील मुसलमानांनी देशाची फाळणी करून मुसलमानांसाठी स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याच्या मागणीत झाले. आणि ती मागणी गांधींच्या मानगुटीवर बसून खिलाफत चळवळीत सहभागी मुसलमानांनी ती पूर्णही केली. म्हणून आज पाकिस्तान आपण पाहत आहोत, जो भारतातील मुसलमानांमध्ये फुटीरतेची बीजे पेरून नव्याने फाळणीचे विचार रुजवत आहे. म्हणूनच भारतातील धर्मांध, विघटनवादी, फुटीरतावादी भारतीय मुसलमानांसाठी पाकिस्तान हा २१व्या शतकातील एक प्रकारचा ‘खलिफा’च बनला आहे, असे म्हटले तर अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही.

आजही भारतात रुजवली जातायेत फुटीरतेचे विचार!

यामुळेच तर जेएनयुमध्ये शर्जील इमाम म्हणतो, ‘जर आपल्या संघटनेकडे ५ लाख सदस्य जमले, तर आपण हिंदुस्थानापासून आसामला कायमचे वेगळे करू शकतो.’ , अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी हा पुण्यातील एल्गार परिषदेत ‘आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो’, असे वक्तव्य करून मुसलमानांमध्ये हिंदूद्वेष निर्माण करतो. जेएनयुतील माजी विद्यार्थी नेता शैला रशीद ही ‘भारतीय सैन्य काश्मिरी जनतेवर अत्याचार करतात’, असा गंभीर आरोप करते. तिचे वडील अब्दुल रशीद हे जाहीरपणे सांगतात कि, शैला रशीद हिला काश्मीरमधील फुटीरवादी संघटना हुरियत कॉन्फरन्स यांच्याप्रमाणे विघटनवादी विचारांची तरुणांची संघटना उभी करायची आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयसह काही विदेशी संस्थांच्या पैशाच्या जोरावर उत्तरप्रदेशातील मौलवी महंमद उमर गौतम आणि मौलवी मुफ्ती काजी जहाँगीर आलम कासमी हे ३० अवैध मदरसे चालवतात, त्यातून धर्मांध शिक्षण देतात, मूक-बधीर शाळेतील विद्यार्थी आणि विधवा महिलांना फसवून तब्बल १ हजार हिंदूंचे धर्मांतर करतात. विदेशी मुसलमान संघटना भारतात भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर ‘हलाल अर्थव्यवस्था’ निर्माण करतात. ते भारतातील विविध भारतीय उत्पादकांना ‘हलाल सर्टिफिकेट’ घेण्याची सक्ती करतात. याचा अर्थ संबंधित उत्पादन इस्लामचे नियम पाळून बनवण्यात आले आहे. आणि भारतातील मुसलमान तीच उत्पादने घेतात जी हलाल सर्टिफाईड आहेत, त्यामुळे नाईलाजास्तव भारतातील उत्पादक हे सर्टिफिकेट घेतात आणि कोट्यवधी रुपये विदेशात देतात. शाहीन बाग आंदोलन असो की दिल्लीची जातीय दंगल, अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत कि ज्यामधून भारतातील धर्मांध मुसलमानांवर पाकिस्तान नामक खलिफाचा प्रभाव पडलेला आहे. म्हणूनच हजारो शर्जील, शैला रशीद जम्मू-काश्मीर, पूर्वांचल, प. बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मालेगाव आणि मुंबईतील बहिरामपाडा, भेंडी बाजार येथे निर्माण झालेले आहेत.

म्हणूनच भारतात या विघटनवादी, फुटीरतावादी विचारांना आळा घालण्यासाठी भारतीय मुसलमानांना मागील ७० वर्षांत ज्या माध्यमातून स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी योजना निर्माण केल्या, कायदे बनवण्यात आले, सवलती देण्यात आल्या, ते सर्व आता बंद करण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांना समान नागरी कायद्यात बसवण्याची गरज आहे. अन्यथा पाकिस्तानसारख्या ‘खलिफा’चा जो भारतातील धर्मांध मुसलमानांवर प्रभाव पडला आहे, तो कमी होणार नाही आणि भारत एकसंघ राहणार नाही!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.