Gokhale Bridge Andheri : अंधेरीतील गोखले पुलाच्या गर्डर जोडणीचे काम जलदगतीने सुरु

167
Gokhale Bridge Andheri : अंधेरीतील गोखले पुलाच्या गर्डर जोडणीचे काम जलदगतीने सुरु
Gokhale Bridge Andheri : अंधेरीतील गोखले पुलाच्या गर्डर जोडणीचे काम जलदगतीने सुरु

अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या किमान तीन मार्गिका सुरू करण्याच्या उद्देशाने महत्वाचा टप्पा सुरू झाला आहे. या पुलाच्या उजव्या बाजूच्या (उत्तरेकडील) गर्डरचे ६२ टन वजनी सुटे भाग मुंबईत प्रकल्प स्थळी दाखल झाले असून उर्वरीत सुटे भाग ऑगस्ट महिन्यात दाखल होणार आहेत. एकूण ९० मीटर लांब गर्डरसाठी सर्व सुट्या भागांची जोडणी करून नंतर रेल्वेच्या परिसरात ते बसवण्याची कार्यवाही महानगरपालिका आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने करण्यात येईल.

अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. महानगरपालिका आणि पश्चिम रेल्वे प्रशासन सर्व संबंधित यंत्रणांसोबत योग्य समन्वय राखून वेगाने या प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पास दिनांक १९ मे २०२३ रोजी भेट दिली होती. प्रकल्पाचा पहिला टप्पा ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू करण्याचे निर्देश त्यांनी त्यावेळी दिले होते. त्यानुसार या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या सहकार्याने हा प्रकल्प आता वेगाने पुढे सरकतो आहे. मुंबईत गर्डरचे ६२ टन वजनी सुटे भाग असलेली पहिली खेप प्रकल्प स्थळी शुक्रवारी २८ जुलै २०२३ दाखल झाली. पहिल्या खेपेसह मुंबईत दाखल झालेल्या टीमचे स्वागत करण्यासाठी उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले हे उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी आयआयटी मुंबईने रेल्वे परिसरातील ९० मीटरच्या गर्डरचे डिझाईन अभ्यासले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डाने या डिझाईनला मंजुरी दिली होती. त्यानुसार, अंबाला येथे मे. एच. एम. एम. इन्फ्रास्ट्रक्चर या रेल्वे प्राधिकृत कारखान्यामध्ये गर्डर निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. आता, पुलाच्या उजव्या बाजूच्या अर्थात उत्तर दिशेला (बोरिवली बाजूचे) स्थापन केल्या जाणाऱ्या गर्डरच्या सुट्या भागांची पहिली खेप मुंबईत दाखल झाली आहे. पहिल्या खेपेत प्राप्त झालेले सुटे भाग हे दोन ट्रेलरद्वारे वाहून आणण्यात आले. गर्डरचा तळ असलेले हे सुटे भाग असून त्यांचे वजन एकूण ६२ टन आहे. तर उर्वरीत सुटे भाग वाहून आणणारे ट्रेलर्स सध्या मुंबईच्या दिशेने प्रवासात आहेत. ऑगस्ट महिन्यात या पहिल्या गर्डरचे सर्व सुटे भाग मुंबईत दाखल होतील, असे नियोजन आहे.

(हेही वाचा – Conjunctivitis : डोळे आलेत का…? अशी घ्या काळजी)

दरम्यान, पहिल्या गर्डरचे सुटे भाग तयार करण्याचे काम पूर्ण होऊन लागलीच दुसऱ्या म्हणजे डाव्या बाजूच्या (दक्षिणेकडील म्हणजे चर्चगेट बाजूच्या) गर्डरची निर्मिती देखील अंबाला येथे लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक लोखंड प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुसऱ्या गर्डरच्या सुट्या भागांची निर्मिती पूर्ण करून फेब्रुवारी महिन्यात ते देखील मुंबईत दाखल होतील, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून ठामपणे नमूद करण्यात येते की, दोन्ही गर्डर निर्मिती आणि बांधणीचे काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असून ठरलेल्या वेळेत ते पूर्ण देखील होईल.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने जुना पूल पूर्णपणे तोडून २८ मार्च २०२३ रोजी महानगरपालिकेकडे प्रकल्पाचे कामकाज हस्तांतरित केले. तेव्हापासून आत्तापर्यंत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील या पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे (approach road) सुमारे ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रवेश मार्गिकांचे बांधकाम प्रगतिपथावर असून हे उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण होईल. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेच्या वाहतुकीला अडचण येऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाने पर्यायी मार्ग सुरळीत राखले आहेत. भुयारी मार्गांमध्ये पावसाळ्यात पाण्याचा जलद गतीने निचरा व्हावा म्हणून पंपांची व्यवस्था केली आहे. तसेच पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि इतर सर्व संबंधित यंत्रणांसोबत नियमित समन्वय राखला जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.