Thane : ठाण्यात हत्यारांचा साठा जप्त; १७ पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणात काडतुसे हस्तगत; दोघांना अटक

या टोळ्यांना बेकायदेशीर शस्त्रे कोण पुरवत आहे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असताना ठाण्यातील राबोडी येथे दोन इसम शस्त्रांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली होती.

309
ठाण्यातील राबोडी परिसरातून गुन्हे शाखेने शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी मध्यप्रदेश मधील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.जप्त करण्यात आलेल्या हत्यारांमध्ये १७ देशी बनावटीचे पिस्तुल, १२ जिवंत काडतुसे आणि ३१ मॅगझीनचा समावेश आहे. ही शस्त्रे मध्यप्रदेशातील बृहनपूर जिल्ह्यातून आणण्यात आली होती, मात्र ही शस्त्रे ठाण्यात कुणाला देण्यात येणार होती याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात मिळून आलेल्या या शस्त्रासाठ्याने एकच खळबळ उडवून दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत वाढत्या गुन्हेगारी सोबत गुंड टोळ्याकडून पिस्तुल, रिव्हॉल्व्हर या शस्त्रांचा सर्रासपणे वापर केला जात आहे. या टोळ्यांना बेकायदेशीर शस्त्रे कोण पुरवत आहे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असताना ठाण्यातील राबोडी येथे दोन इसम शस्त्रांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली होती. पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे आणि पथकाने दोन दिवसांपूर्वी राबोडी परिसरात सापळा रचून रमेश मिसरिया किराडे बिलाला आणि मुन्ना अमशा अलवे बारेला या दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन देशी बनावटीचे पिस्तुल ६ मॅगझीन,४ जिवंत काडतुसे मिळून आली.
गुन्हे शाखेने या दोघांना अटक करून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी ही शस्त्रे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रच्या सीमेवर असणाऱ्या पाचोरे-धनुरे या गावातील तेहरसिंग शिकलकार हा ही शस्त्रे बनवून त्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना दिली. गुन्हे शाखेने या माहितीच्या आधारे पाचोरे-धनुका मध्यप्रदेश या ठिकाणी छापेमारी करून आणखी १४ देशी बनावटीचे पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि मॅगझीन जप्त करण्यात आली आहे. ही सर्व शस्त्रे पाचोरे धनुरे गावात एका खोलीत हाताने तयार करण्यात आलेली असून या शस्त्रांची विक्री मुंबई, ठाणेसह महाराष्ट्रात करण्यात येणार होती अशी माहिती तपासात समोर आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.