Swatantrya Veer Savarkar Film : वीर सावरकरांचे कार्य घराघरात पोहचवण्यासाठी नाशिकमधील तरुणांचा अनोखा उपक्रम

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचे किमान २५ ते ३० ग्रुप बुकिंग शो आयोजित करण्यात आले आहेत.

199

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Film) या चित्रपटातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि त्यांचे कार्य याची ठळकपणे ओळख होते. त्यांचे हे कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहचावे, यासाठी तरुण एकत्र येऊन या चित्रपटाचे ग्रुप बुकिंग करत आहेत. नाशिक येथील वीर सावरकर यांच्या जन्मभूमीत हे तरुण या चित्रपटाचे शो आयोजित करत आहेत. शुक्रवार, १२ एप्रिल रोजी या चित्रपटाच्या शोच्या प्रसंगी चित्रपटाचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि वीर सावरकर यांची भूमिका करणारे अभिनेते रणदीप हुड्डा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.

‘मारीता मारिता मरेतो झुंजेन…’ अशी बालपणी शपथ घेऊन, वीर सावरकर यांनी त्याचे आयुष्यभर पालन केले. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’  (Swatantrya Veer Savarkar Film) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटात केवळ सावरकरांचे चरित्रच नव्हे, तर स्वातंत्र्य युद्धातील संपूर्ण सशस्त्र क्रांतीच्या चळवळीचा आणि त्यायोगे घडणाऱ्या घटनांचा आढावा घेण्यात आला आहे. चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा म्हणून नाशिकमधील काही समविचारी तरुणांनी एकत्र येऊन या चित्रपटाच्या शोचे ग्रुप बुकिंग केले. याप्रसंगी रणदीप हुड्डा आणि सात्यकी सावरकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

(हेही वाचा Swatantrya Veer Savarkar : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद)

तीन हजार विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवणार 

यावेळी अक्षता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले, तर पाहुण्यांचे स्वागत प्रातिनिधीक स्वरूपात स्वप्निल माशाळकर आणि नीरज कुलकर्णी यांनी केले. यावेळी ‘जयोस्तुते…’ हे गाणे प्रसिद्ध बासरीवादक मोहन उपासनी यांनी बासरीद्वारे ऐकवले. या शोसाठी जयेश क्षेमकल्याणी, नितीन जोशी, अक्षता देशपांडे, दुर्गा पुराणिक, प्रसाद धोपावकर, उर्विश जोशी, अविक्षित वैद्य, मैथिली नाचणे, राजेंद्र नाचणे, प्रसाद मुडावतकर, अंकुश अहिरराव, दीपाली अहिरराव, सार्थकी माशाळकर, प्राक्तना पुराणिक, मुकंद झगडे, दिनेश भागवत, चंद्रिकाबेन पटेल, निपुल शाह यांनीही परिश्रम घेतले. या  (Swatantrya Veer Savarkar Film) शोकरता सर्व जण पारंपरिक पोशाखात आले होते. चित्रपटगृहात उत्साहाचे वातावरण होते. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून ते समाजप्रबोधनाचे देखील एक प्रभावी माध्यम आहे. वास्तविक पाहता अशा राष्ट्रभावना वाढवणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करणे आणि त्यासाठी अपेक्षित प्रेक्षक वर्ग मिळवून तो चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी करणे, हे धाडसी काम आहे. अशा चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक वर्ग कसा मिळवावा अशी चर्चा समविचारी तरुणांनी केली, तेव्हा ग्रुप बुकिंग ही संकल्पना सुचली. चांगला चित्रपट पाहायला जाताना केवळ एकट्याने न जाता आपण किमान एक शो भरेल एवढे समविचारी लोक घेऊन जावे आणि शो बुक करावा असा तो विचार. या उपक्रमानुसार ‘पावनखिंड’ या चित्रपटाचा शो आयोजित केला होता. त्यानंतर अशा प्रकारच्या चित्रपटांच्या ग्रुप बुकिंग शो करण्याची मागणी स्वप्निल माशाळकर यांच्याकडे होऊ लागली. त्यानंतर छत्रपती महाराजांवरील चित्रपट, काश्मीर फाइल्स, दी केरला स्टोरी आणि आता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Film) या चित्रपटाचे किमान २५ ते ३० ग्रुप बुकिंग शो आयोजित करण्यात आले आहेत. या आठवड्यात किमान तीन हजार विद्यार्थ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट दाखवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.