तुम्हाला बाकावर बसणारा खासदार हवा की मंत्री होणारा खासदार; Raj Thackeray यांचे कोकणी जनतेला आवाहन

नारायण राणेंना मुख्यमंत्री पदाची ६ महिने मिळाली होती, पूर्ण ५ वर्षे मिळाली असती तर आज कुणाला प्रचारासाठी इथे येण्याची गरजच भासली नसती, असे गौरवोद्गार राज ठाकरे यांनी काढले.

130

राज्यात अंतुले यांच्यानंतर कामामध्ये वाघ असणारा दुसरा मुख्यमंत्री जर कुणी झाला असेल तर ते नारायण राणे, असे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणत असत. कोणताही विषय समजून घेणे, त्याची माहिती घेऊन मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न  करणारी व्यक्ती आज आपल्यासमोर खासदार होण्यासाठी उमेदवार म्हणून उभी आहे. त्यामुळे कोकणातील जनतेने आता ठरवावे की, त्यांना संसदेत बाकावर जावून बसणारा खासदार हवा आहे की केंद्रात जावून मंत्री होणारा खासदार हवा आहे, असा सवाल करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खासदार म्हणून निवडून येवून राणे हे केंद्रात मंत्री होतील, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

राणे निवडून आलेच आहेत

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवलीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा शनिवारी सायंकाळी पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी कोकणातील जनतेला जाहीर आवाहन करत नारायण राणे यांना निवडून देण्याची विनंती केली. याप्रसंगी बोलतांना राज ठाकरे यांनी मी संबंध जपणारा आहे. राणे यांच्या प्रचारासाठी मला येण्याची आवश्यकताच नाही. ते निवडून आलेलेच आहे. कोकणातील जनता सुजाण आहे. या कोकणातून ९ भारत रत्न देशाला दिले असून त्यातील चार भारत रत्न हे एकट्या दापोलीतील आहेत, असेही राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा Lok Sabha Election : संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी दिग्गजांची फौज; शाहू महाराजांकडे मात्र मविआच्या नेत्यांचे दुर्लक्ष )

मी मित्राची खरडपट्टी काढताना आणि दुश्मानाची स्तुती करताना मागे पुढे पाहत नाही. सन २०१९मध्ये मोदी सरकारविरोधात जे बोललो ते बोलण्याची  हिंमत आजही विरोधकांमध्ये नाही, पण माझा हेतु पारदर्शक होता. शुक्रवारी कोकणात उध्दव ठाकरे येवून गेले, याचा समाचार घेताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, जे काल बोलले ते त्यांचे अडीच वर्षांचे झंगाट होते म्हणून, पण समजा भाजपाने त्यांची अडीच वर्षे मान्य केली असती तर ते या भाजपाच्या विरोधात बोलले असते का, असाही सवाल त्यांनी केला. आज त्यांची सत्ता हिरावून घेतली म्हणून ते बोलत आहेत.

जमिनीच्या धंद्यासाठी प्रकल्पांना विरोध 

ते इकडे येवून म्हणतात की, कोकणातील उद्योगंधंदे गुजरातला पळवले जात आहे. पण सन २०१४ ते २०१९ भाजपासोबत सरकारमध्ये होते आणि त्यानंतर २०१९ ते २०२२ पर्यंत ते स्वत: मुख्यमंत्री होते. म्हणजे साडेसात वर्षे ते सत्तेत होते. मग का गेले बाहेर उद्योग धंदे?, असा सवाल करत उद्योग आला की येथील त्यांचा खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार असाच प्रकार सुरु आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आला आणि तिथे स्फोट झाला तर काय होईल, अशी भिती विरोधकांकडून दाखवली जाते, पण अशाप्रकारचे अणुऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये १९९३ साली, मद्रासमध्ये १९८४मध्ये, उत्तरप्रदेशमध्ये १९९१ साली, कर्नाटकमध्ये २०००साली, राजस्थानमध्ये १९८०साली, तारापूरमध्ये १९६८साली, तामिळनाडूमध्ये २०१३साली अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले, त्यांची जंत्रीच त्यांनी वाचवून दाखवली. याठिकाणी कधीही स्फोट झाला नाही. एवढेच नाही तर भाभा ऑटोमिक सेंटर हे मुंबईत आहे, न्युक्लियर रिऍक्टरटरचा स्फोट होतो ते मुंबईत आहे,  तिथे मला कधी आठवले नाही की हे विरोधक त्यावर काही बोलले आहेत. पण कोकणात प्रकल्प येवू द्यायचा नाही, असे राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray)

(हेही वाचा PM Narendra Modi : पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार; पंतप्रधान मोदी यांची ग्वाही)

नाणारला विरोध केला. तिकडे जमिनी गेल्या कशा, कुणी खरेदी केल्या, त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि म्हणाले बारसूला हलवा. कारण ५ हजार एकर जमीन सापडली. अचानक इतकी मोठी जमीन आली कुठून. आधीच जामीन खरेदी करून घ्यायच्या, प्रकल्पाला विरोध करून तो थांबवायचा, जमिनीच्या किमती वाढवायच्या आणि मग जमिनीत त्या प्रकल्पाला भरंसाठी किमतीतही विकायचा हे सगळे यांचे धंदे सुरु आहेत. लक्षात घ्या हा जमिनीचा धंदा आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. हा प्रदेश सुंदर आहे. जैव विविधता लाभली आहे. हा प्रदेश अमेझॉनच्या जंगलानंतर दोन नंबरला येतो, पण आपण यासाठी काय करतो, तर काही नाही. मी म्हणतो इथे हॉटेल्स आणा आणि इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरु करा, अशी सूचना करत नारायण राणेंना मुख्यमंत्री पदाची ६ महिने मिळाली होती, पूर्ण ५ वर्षे मिळाली असती तर आज कुणाला प्रचारासाठी इथे येण्याची गरजच भासली नसती, असे गौरवोद्गार राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काढले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.