SRA : एसआरए वसाहतींमधील प्रसाधन गृहांची तपासणी करणार महापालिका

जर एखादा विकासक योग्य रीतीने स्वच्छता आणि प्रसाधनगृहांची देखभाल करत नसेल, त्याबाबत महानगरपालिका प्रशासन आपल्या अखत्यारीतील सक्त कार्यवाही करेल

154
SRA : एसआरए वसाहतींमधील प्रसाधन गृहांची तपासणी करणार महापालिका
SRA : एसआरए वसाहतींमधील प्रसाधन गृहांची तपासणी करणार महापालिका
संपूर्ण मुंबईत ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) असे प्रकल्प आहेत, त्याची यादी महानगरपालिका प्रशासनाकडे सोपवण्याचे निर्देश. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी संबंधित प्राधिकरणाला दिले. म्हणजे त्या ठिकाणच्या सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्थिती नेमकी कशी आहे याची माहिती महानगरपालिकेच्या सर्व विभागीय सहायक आयुक्त मार्फत तपासून घेण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता अर्धवट राहिलेल्या सर्व एसआरए प्रकल्पातील सर्व प्रसाधन  गृहांची माहिती गोळा करून त्यांच्या दुरूस्तीचे काम महापालिकेच्या वतीने हाती  घेतले जाणार आहे.
राज्याचे माननीय मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी रविवारी १ ऑक्टोबर २०२३ रोजी कुर्ला येथील नेहरूनगर भागात वत्सलाताई नाईक नगर या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)अंतर्गत येत असलेल्या परिसराला अचानक भेट देऊन तेथील सार्वजनिक स्वच्छता कामांची पाहणी केली होती. या दौऱ्याप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल हे उपस्थित होते.

(हेही वाचा- Asian Games 2023 : बक्षिसांची लयलूट सुरूच, तिरंदाजीत ज्योती ओजसची सुवर्णकामगिरी)

या पाहणी प्रसंगी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सार्वजनिक स्वच्छता तसेच प्रसाधनगृहांच्या दुरुस्ती आणि स्वच्छतेबाबत दिलेले निर्देश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला (SRA) सुचित करण्यासह महानगरपालिकेच्या वतीने कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी ३ ऑक्टोबर २०२३ दुपारी बैठक पार पडली.

या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, आमदार मंगेश कुडाळकर, उपायुक्त (परिमंडळ ५)  हर्षद काळे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  चंदा जाधव, एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे, एल विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) धनाजी हेर्लेकर, जल अभियंता  पुरुषोत्तम माळवदे त्याचप्रमाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता म्हसाळ, सहायक अभियंता  तनपुरे आणि वत्सलाताई नाईक नगर प्रकल्प विकासाच्या वतीने संबंधित वास्तूविशारद आदी या बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीतूनच महानगरपालिका आयुक्तांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यात त्यांनी संपूर्ण मुंबईत ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे असे प्रकल्प आहेत, त्याची यादी महानगरपालिका प्रशासनाकडे सोपवावी. त्या ठिकाणच्या सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्थिती नेमकी कशी आहे याची माहिती महानगरपालिकेच्या सर्व विभागीय सहायक आयुक्त मार्फत तपासून घेण्यात येईल. तसेच ज्या ज्या ठिकाणी स्वच्छता आणि दुरुस्तीची गरज असेल, त्याबाबत नेमकी कशी कार्यवाही भविष्यात करण्यात यावी, याची दिशा मुंबई महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एकत्रितपणे ठरवेल, असे आयुक्तांनी याप्रसंगी सांगितले.
जर एखादा विकासक योग्य रीतीने स्वच्छता आणि प्रसाधनगृहांची देखभाल करत नसेल, त्याबाबत महानगरपालिका प्रशासन आपल्या अखत्यारीतील सक्त कार्यवाही करेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. कारण इतर प्राधिकरणाच्या हद्दीतील अशा बाबींचा ठपका अकारण महानगरपालिकेवर येतो. त्यामुळे शासन आणि महानगरपालिका यांची प्रतिमा जपण्यासाठी अशी कठोर कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सुचित केले.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=u5nkQ-4QciU

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.