Railway Line Tree Cutting : रेल्वे लगत झाडांवरील फांद्यांच्या छाटणीचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतूनच 

५२ ठिकाणी मिळून असलेल्या एकूण २ हजार ४२४ पैकी निम्म्याहून अधिक झाडांची छाटणी झाली आहे. घाटकोपर, विद्याविहार, वडाळा आदी परिसरातील रेल्वे रुळालगतच्या झाडांची छाटणी सुरू आहे.

591
  • सचिन धानजी, मुंबई

रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी मुंबई महापालिकेच्या वतीने नि:शुल्क केली जात असतानाच खासगी सोसायटीच्या आवारातील झाडांच्या फांद्या छाटणीसाठी महापालिकेच्यावतीने पैसे आकारले जातात. परंतु जिथे रेल्वे प्रशासन स्वखर्चाने रेल्वे रुळालगतच्या भागातील झाडांची छाटणी (Railway Line Tree Cutting) करत असतानाच आता ही छाटणी महापालिकेच्यावतीन केली जात आहे. या छाटणीसाठी महापालिकेच्यावतीने खर्च करण्यात येत आहेत.

tree 1

५० टक्क्यांहून अधिक झाडांची छाटणी पूर्ण

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने पावसाळापूर्व खबरदारी म्हणून मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामे करण्यात येत आहे. या कामांतर्गतच मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांलगत असलेल्या झाडांच्याही छाटणीला (Railway Line Tree Cutting) वेग देण्यात आला आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गालगत ५२ ठिकाणे मिळून एकूण २ हजार ४२४ झाडांची छाटणी करणे गरजेचे असून त्यातील ५० टक्क्यांहून अधिक झाडांची छाटणी पूर्ण करण्यात आली आहेत, आणि उर्वरित झाडांची छाटणीदेखील लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा कसाबची बाजू घेणाऱ्यांना राज्यातून हद्दपार करा; PM Narendra Modi यांचे आवाहन)

रेल्वे रुळांलगत धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांची छाटणी

पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मध्य, पश्चिम आणि हार्बर उपनगरीय रेल्वे मार्गालगतच्या झाडांची सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात काही दिवसांपूर्वी पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठकप्रसंगी दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे रुळांलगत धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांची छाटणी (Railway Line Tree Cutting) करण्यात येत आहे.

एकूण ५२ ठिकाणच्या झाडांच्या छाटणीसाठी परवानगी

सर्वेक्षणानुसार या तीन रेल्वे मार्गालगत २ हजार ४२४ झाडांच्या छाटणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यातील पश्चिम रेल्वे रुळालगतची ३४, मध्ये रेल्वे लगतची १६ आणि हार्बर रेल्वे मार्गालगतची २ अशा एकूण ५२ ठिकाणच्या झाडांच्या छाटणीसाठी (Railway Line Tree Cutting) उद्यान विभागाने परवानगी दिली आहे. या ५२ ठिकाणी मिळून असलेल्या एकूण २ हजार ४२४ पैकी निम्म्याहून अधिक झाडांची छाटणी झाली आहे. घाटकोपर, विद्याविहार, वडाळा आदी परिसरातील रेल्वे रुळालगतच्या झाडांची छाटणी सुरू आहे.

झाडांच्या छाटणीसाठी रेल्वे प्रशासनाचा खर्च

महापालिकेचे तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांनी रेल्वे प्रशासनासह इतर प्राधिकरणांना एक गठ्ठा परवानगी दिली होती आणि त्यानुसार रेल्वे प्रशासन हे रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी (Railway Line Tree Cutting)  स्वत:च करत असे. त्यामुळे रेल्वे हद्दीतील झाडांच्या छाटणीसाठी महापालिकेला कोणताही पैसा खर्च करावा लागत नव्हता. परंतु आता याच रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी महापालिकेच्या वतीने केली जात आहे. त्यामुळे ज्या झाडांच्या छाटणीसाठी रेल्वे प्रशासन खर्च करत होते, तोच खर्च आता महापालिकेला करावा लागत आहे.

सरसकट दिलेली परवानगी रद्द

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेच्या तत्कालिन आयुक्तांनी रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्या रेल्वे मार्गावर पडून वाहतूक खोळंबली जात असल्याने सुरक्षेच्या उपाय म्हणून सरसकट झाडे कापण्याची त्यांना परवानगी दिली होती. परंतु याबाबत न्यायालयात याचिका झाल्यानंतर अशाप्रकारच्या सरसकट परवानगीची गरज नसून संबंधित प्राधिकरणाला आवश्यक वाटेल तेव्हा ते परवानगी घेऊन शकतात आणि त्याप्रमाणे महापालिकेने द्यावी अशाप्रकारचे निर्देश दिले. त्यामुळे ही सरसकट दिलेली परवानगी रद्द करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.