Vijay Wadettiwar यांच्या अडचणीत वाढ; आता भाजपाकडून कायदेशीर नोटीस जारी

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार अर्जुन गुप्ता यांच्या वतीने ॲड. शिंदे यांनी वडेट्टीवार यांना ही नोटीस बजावली आहे.

151

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबई अतिरेकी हल्ल्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांना दहशतवा‌द्यांनी गोळ्या घातल्या नाहीत, तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने ते कृत्य केले, असा दावा केला. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी वडेट्टीवार यांनी हा खटाटोप केला, असे सांगत  भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आता भाजपाचे प्रदेश कायदा विभागाचे सहसंयोजक ॲड. शहाजी शिंदे यांनी वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे.

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार अर्जुन गुप्ता यांच्या वतीने ॲड. शिंदे यांनी वडेट्टीवार यांना ही नोटीस बजावली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर झालेल्या सुनावणीनंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने अजमल कसाबचे फाशीच्या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळताना कसाबने आपणच हेमंत करकरे यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांना ठार केल्याच्या कबुलीजबाबाचा विशेष उल्लेखही केला होता. असे असतानाही, हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबची नव्हती, ही गोष्ट दडपणारे उज्जवल निकम हे देशद्रोही आहेत, असे विधान केल्याबद्दल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना ही नोटीस बजावल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे.

(हेही कसाबची बाजू घेणाऱ्यांना राज्यातून हद्दपार करा; PM Narendra Modi यांचे आवाहन)

वडेट्टीवार यांना १५ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश 

ॲड. शहाजी शिंदे यांनी नोटीशीत म्हटले आहे की, मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात 11 दहशतवाद्यांचा सहभाग होता. त्यापैकी एकाला म्हणजे अजमल कसाबला जिवंत पकडण्यात यश मिळाले. कसाब याच्यावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून न्यायालयात खटला दाखल केला गेला. सत्र  न्यायालयात न्या. तहलियानी यांनी उपलब्ध पुराव्यांचा विचार करून कसाबला फाशीची शिक्षा सुनावली. याविरुद्ध कसाबने उच्च न्यायालयात अपील केले होते. ते अपील फेटाळून उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. कसाबतर्फे सर्वोच्च न्यायालयात या शिक्षेला आव्हान दिले गेले. सर्वोच्च न्यायालयाने कसाबचे अपील फेटाळून त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली. सर्वोच्च न्यायालयाने कसाबचे अपील फेटाळताना कसाबने आपण हेमंत करकरे यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केल्याबाबत दिलेल्या कबुलीजबाबाचा निकालपत्रात विशेष उल्लेख केला आहे. असे  असतानाही वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी  करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीमुळे झाला नाही असे विधान जाहीररित्या करून न्यायालयाचा अवमान केला आहे. या नोटिशीला 15 दिवसांत उत्तर न दिल्यास आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरु करण्यात येईल, असेही नोटिशीत नमूद केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.