महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी १ ऑगस्ट २०२६ पासून एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अर्थात स्मार्ट कार्ड (Smart card) अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डशिवाय सवलतीच्या दरातील प्रवासाचा लाभ मिळणार नसल्याची माहिती एसटी (ST) प्रशासनाने दिली आहे.
एसटीचा प्रवास अधिक डिजिटल, पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने (State Govt) एनसीएमसी स्मार्ट कार्ड (Smart card) योजना सुरू केली असून, तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. राज्यभरातून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे ५१ लाख प्रवाशांनी नोंदणी केली आहे.
एसटी प्रशासनाच्या माहितीनुसार, नोंदणीकृत प्रवाशांपैकी २५ लाख नागरिकांना स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले असून उर्वरित कार्डांचे वितरण वेगाने सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक अधिकृत वितरण केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत.
(हेही वाचा – Weather: हवामान खात्याकडे असते कोणती ‘महा-शक्ती’? सुपर कम्प्युटर्स आणि समुद्रातील सेन्सर्स कसे ओळखतात मान्सूनची चाल?)
दरम्यान, काही केंद्रांकडून स्मार्ट कार्डासाठी निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एसटी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या केंद्रांचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
१ ऑगस्टपासून सवलतीचा लाभ अखंडितपणे मिळत राहावा यासाठी पात्र प्रवाशांनी तातडीने जवळच्या एसटी बसस्थानकावर किंवा अधिकृत वितरण केंद्रावर जाऊन स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केले आहे.
स्मार्ट कार्ड प्रणालीमुळे प्रवास व्यवस्थापन अधिक सुलभ होणार असून सवलतींचा लाभ पारदर्शक आणि प्रभावीपणे पात्र प्रवाशांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

