सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत आकस का?

113

राज्यात २ सप्टेंबरपासून मिशन बिगीन अगेन ४ ला सुरुवात झाली असून, यामध्ये काही सवलती देत सरकारने हॉटेल्स आणि मॉल्स सुरु करण्याला परवानगी दिली आहे. मात्र अनलॉक ४ मध्ये मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाही. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले असून, या सरकारला मंदिरे उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज ठाकरे यांनी सरकारला पत्र लिहून “सध्या महाविकास आघाडी सरकारचे काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारे आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाही? तसेच, ‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असे का? सरकारला मंदिरे उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

oie 384325MFZfO8Gf

महाराष्ट्रात देऊळ बंद का?

कोरोनामुळे जेव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेंव्हा मंदिरे बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही देखील समर्थन केले होते पण आज जेंव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमके महाराष्ट्रातच देऊळं का बंद ठेवली जात आहेत? जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथिल करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच चौकट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या असे राज ठाकरे यावेळी म्हणालेत. मंदिरात काम करणाऱ्यांच्या रोजगाराबाबतही राज ठाकरे यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला. “मंदिरे सुरु करणे म्हणजे निव्वळ काही भक्तांच्या पुरता हा विषय मर्यादित नाही, इथे त्यात देवाची सेवा करणारे पुजारी असोत, गुरव असोत की त्या मंदिरावर अवलंबून असणारी एक छोटीशी अर्थव्यवस्था असो यांचा सरकार विचार करणार आहे का नाही? मध्यंतरी माझ्याकडे त्र्यंब्यकेश्वर मंदिराचे पुजारी आले होते त्यांनी हीच व्यथा माझ्याकडे मांडली. एका मंदिरावर त्या गावाची, त्या शहराची अर्थव्यवस्था अवलंबून असते ती अर्थव्यवस्थाच जर कोलमडणार असेल तर त्यांनी साकडे घालायचे कुणाकडे? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.