
- विशेष प्रतिनिधी
शहरी भागातील विद्यार्थ्यांचा शेतीशी थेट संबंध जोडण्यासाठी प्रत्येक शाळेने वर्षातून किमान एकदा कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, अशी आग्रही भूमिका महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी मांडली. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे शिक्षणच विद्यार्थ्यांना शेती, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची खरी ओळख करून देऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात आयोजित शास्त्रज्ञ, शेतकरी आणि विद्यार्थी संवाद कार्यक्रमात नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी संशोधनातील विविध प्रकल्पांची पाहणी करत संशोधक आणि शेतकऱ्यांशीही चर्चा केली.
स्वातंत्र्यपूर्व काळात देशासमोर अन्नसुरक्षेचे मोठे आव्हान होते. मात्र शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे भारत आज अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असून अनेक देशांना अन्नधान्य पुरवणारा देश बनला आहे, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव केला. देशाची अन्नसुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
भारत २०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे लक्ष्य गाठू इच्छित असेल, तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समाधानी असणे अत्यावश्यक आहे. कृषी संशोधनातून विकसित होणारे नवे तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
(हेही वाचा – Mumbai-Goa highway: मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, मुंबईकडे येणाऱ्या लेनवर वाहनांच्या तिहेरी रांगा)
यावेळी नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, भात जलद पैदास (स्पीड ब्रीडिंग) केंद्र तसेच यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाची पाहणी केली. संशोधन आणि प्रत्यक्ष शेती यांची सांगड घालणे ही भविष्यातील कृषी विकासाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.
दौऱ्यादरम्यान त्यांनी मालाड (Malad) येथील उत्कर्ष मंदिर विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतात उतरून भात लागवडीत सहभाग घेतला. या अनुभवातून विद्यार्थ्यांना शेतीचे वास्तव समजेल आणि कृषी क्षेत्राविषयी आत्मीयता निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी देशाची अन्नसुरक्षा बळकट करण्यासाठी कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. राज्यातील प्रत्येक शहरी शाळेने विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी किमान एक कृषी अभ्यास सहल (Agricultural study tour) आयोजित करावी, अशी त्यांनी सूचना केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
