-
सचिन धानजी, मुंबई
वरळीतील राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या पोद्दार रुग्णालयाला (Poddar Hospital) महापालिकेच्यावतीने ३० खाटांची आयसीयू सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोविड काळात महापालिकेच्यावतीने पोद्दार रुग्णालयात आयसीयू बेडची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु आता कोविडनंतर या सुविधेचा वापर पोद्दार रुग्णालयाकडून केला जात असली तरी आता खऱ्या अर्थाने महापालिकेच्यावतीने यासाठी खर्च केलेला काही निधीचा खर्च आकारुन ही सुविधा पोद्दार रुग्णालयाला हस्तांतरित करण्यात येत आहे.
कोविड काळात वरळीतील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या पोद्दार रुग्णालयामध्ये (Poddar Hospital) रुग्णांना सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेच्यावतीने ३० बेडचे आयसीयू युनिट उभारण्यात आले होते. या रुग्णालयात आयसीयू बेडची सुविधा नसल्याने महापालिकेने कोविड रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिले होते. यासाठी महापालिकेने ८.८८ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देवून २२ जुलै २०२२१ मध्ये नियुक्त कंत्राटदाराकडून हे काम करून घेतले होते. पुढे यातील कामे स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे या कामाच्या खर्चातील काही अधिदान नियुक्त कंत्राटदाराला देण्यात आलेले नाही. या आयसीयू कक्षातील सर्व विद्युत कामे, वातानुकुलित यंत्रणा, मेडिकल गॅस पाईपलाईन सिस्टीम आदींची कामे पूर्ण झालेली आहेत. मात्र, ही कामे केल्यानंतरही कंत्राटदाराला कामाचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत.
(हेही वाचा – BMC : महापालिका कामगारांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी; आयुक्तांना दिले पत्र)
कोविड काळानंतर बंद असलेली ही आयसीयूची यंत्रणा पोद्दार रुग्णालयाने सर्व प्रकारची तपासणी करून त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. यामध्ये पोद्दार रुग्णालयामार्फत (Poddar Hospital) प्रसुतीगृह व नवजात अर्भकांसाठी वापरण्यात येत आहे. या आयसीयू बेडच्या सुविधेमुळे या रुग्णालयाला अत्यावस्था रुग्णांना तात्काळ सेवा देणे शक्य होत आहे. त्यामुळे पोद्दार रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी महापालिकेला आयसीयू यंत्रणा हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार तत्कालिन अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार १५ मोटराईज बेड व ०८ पेशंत मॉनिटर पोद्दार रुग्णालयाला विनाशुल्क हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला हाता. या आयसीयू बेडच्या सेवेमुळे महापालिकेच्या इतर रुग्णालयांवरील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी येणार असल्याने ही यंत्रणा पोद्दार रुग्णालयाला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेत याला मान्यता दिली आहे.
विनाशुल्क ही सेवा पोद्दार रुग्णालयाला (Poddar Hospital) हस्तांतरित केली जात असून कायमस्वरुपी उभारण्यात आलेली यंत्रणा काढताना त्या यंत्रणेची उपकरणे खराब होण्याची शक्यता नाकारता येत येत नसल्याने ही सेवा हस्तांतरित करण्यात येत आहे. एका बाजूला यासाठी केलेल्या खर्चातील रक्कम कंत्राट कंपनीला अद्यापही देण्यात आलेली नाही, पण हीच सेवा पोद्दार रुग्णालयाला देताना भविष्यात याचे ऑडिट करायचे झाल्यास ते कसे करणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

