
-
ऋजुता लुकतुके
National Handloom Day : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड)तर्फे मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील मुख्यालयात ५ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तीन दिवसीय राष्ट्रीय हातमाग प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भारतातील पारंपरिक हातमाग वारशाचे जतन आणि वीणकरांच्या उपजीविकेला बळ देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात पैठणी, पोचमपल्ली इकत, कोटा डोरिया, संभलपुरी, भागलपूर सिल्क, कांथा स्टिच, कच्छ शाली, वेंकटगिरी, अरनी सिल्क, बलरामपुरम, मुबारकपूर, अंबाला हँडलूम, बाघ, भगैया सिल्क आणि उत्तरिया या १५ प्रसिद्ध हातमाग परंपरांचे प्रतिनिधित्व करणारी उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत. यापैकी अनेक उत्पादने भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त आहेत. ग्राहकांना या प्रदर्शनात कारागीर आणि उत्पादकांकडून थेट खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.
६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता खरेदीदार-विक्रेता मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून कारागीर, उत्पादक गट, संस्थात्मक खरेदीदार आणि बाजारपेठेतील विविध घटक यांच्यात थेट संवाद घडवून आणून दीर्घकालीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्याचा नाबार्डचा प्रयत्न आहे.
(हेही वाचा – JPSC Paper Leak: झारखंड लोकसेवा आयोग परीक्षा घोटाळा: आणखी ५ आरोपींना अटक; विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र )
या प्रदर्शनात महाराष्ट्रातील पैठणी साड्यांचं प्रतिनिधित्व करत आहेत, येवल्यातील पैठणी वीणकर सुषमा देशमुख. त्यांच्या मागच्या काही पिढ्या या व्यवसायात आहेत. आणि अलीकडे पैठणीवर झालेले आधुनिक संस्कार त्यांनीही जवळून पाहिले आहेत. त्यानुसार, आपल्या उत्पादनांमध्येही त्यांनी पैठणी धोतर, शेला, टोप्या, ब्लेझर असे आऊटफिट्स आणले आहेत. “अशा प्रदर्शनांमुळे आम्हाला थेट ग्राहकांशी संवाद साधता येतो. मध्यस्थांशिवाय विक्री होत असल्याने आमच्या कष्टाला योग्य मोबदला मिळतो. ग्राहकांना हातमागावरील प्रत्येक डिझाइनमागची परंपरा समजावून सांगण्याची संधीही मिळते,” असं त्या हिंदुस्थान पोस्टशी बोलताना म्हणाल्या.
तर तेलंगणातील पोचमपल्ली इकत विणकर रमेश नाईक यांनीही समाधान व्यक्त केले. “मुंबईसारख्या मोठ्या शहरात प्रदर्शन भरल्यामुळे नवीन ग्राहक मिळत आहेत. व्यापाऱ्यांबरोबरच डिझायनर आणि संस्थात्मक खरेदीदारांशीही संपर्क वाढत आहे. यामुळे भविष्यात नियमित ऑर्डर मिळण्याची आशा आहे,” असे ते म्हणाले.
नाबार्डने गेल्या काही वर्षांत हातमाग क्षेत्रासाठी GI नोंदणीला सहाय्य, कौशल्यविकास, उपजीविका विकास कार्यक्रम आणि ग्रामीण एंटरप्राइज प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स (REPOs) यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण काम केले आहे. या उपक्रमांमुळे बाजारपेठेपर्यंत पोहोचणे, मूल्यवर्धन आणि शाश्वत ग्रामीण रोजगाराला चालना मिळत असल्याचे नाबार्डने स्पष्ट केले.
७ ऑगस्ट रोजी साजरा होणारा राष्ट्रीय हातमाग दिन १९०५ मधील स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ पाळला जातो. भारताच्या सांस्कृतिक वारशात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत हातमाग वीणकरांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याने अशा प्रदर्शनांमुळे पारंपरिक विणकाम परंपरांना नवी बाजारपेठ आणि नवे बळ मिळत असल्याचे या प्रदर्शनातून अधोरेखित झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
