Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ८० टक्के : आता कपात मागे घेण्याशिवाय महापालिकेकडे पर्याय नाही

153
Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ८० टक्के : आता कपात मागे घेण्याशिवाय महापालिकेकडे पर्याय नाही

मुंबईला पाणी पुरवठा (Mumbai Water Stock) करणाऱ्या धरणांमध्ये आता हळूहळू वाढ होत असून यासर्व धरणांमध्ये पाण्याच्या साठा तब्बल ८० टक्के एवढा जमा झाला आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणी साठा ८० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने उर्वरीत महिन्यांमध्ये २० टक्क्यांपर्यंतचा साठा जमा होऊन मुंबईकरांचा वर्षभराची तहान भागेल एवढा साठा जमा होऊ शकतो,असा विश्वास आता जलअभियंता विभागाकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यासाठी मागील आठवड्यात घेण्यात येणारी बैठक येत्या आठवड्यात घेऊन पाणी कपात मागे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला जाईल,असे बोलले जात आहे.

(हेही वाचा – ‘विशेष मिशन इंद्रधनुष्‍य -५.०’ : २६३८ बालकांचे आणि ३०४ गरोदर मातांचे होणार लसीकरण)

मुंबईला पाणी पुरवठा (Mumbai Water Stock) करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३८५० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मागील आठवड्यात २९ जुलै २०२३ रोजी यासर्व तलावांमध्ये १०लाख ३९ हजार ८२५ दशलक्ष लिटर्स अर्थात ७१ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला होता. तर ५ ऑगस्ट २०२३ रोजी ११ लाख ५७ हजार ९१९ दशलक्ष लिटर्स अर्थात ८० टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे एका आठवड्यात ९ टक्के एवढा पाणी साठा वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, मागील दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही पाणी साठा कमी असून याच दिवशी मागील वर्षी ८९.७८ टक्के एवढा पाणीसाठा होता, तर २०२१ मध्ये या सर्व तलावांत ७९.४५ टक्के एवढा पाणीसाठा होता.

मुंबईतील पाणी साठा (Mumbai Water Stock) जुलै महिन्यातच ७० टक्क्यांच्या आसपास पोहोचल्याने सध्या लागू करण्यात आलेली दहा टक्के एवढी पाणीकपात पुढे कायम ठेवणे योग्य नाही. त्यामुळे ही पाणीकपात मागे घेणे महापालिका प्रशासनाला बंधनकारकच आहे. त्यातच तुळशी, विहार, तानसा व मोडक सागर हे चार धरण तथा तलाव भरले असून भातसा धरण ७२ टक्के आणि अप्पर वैतरणा ६१ टक्के एवढे भरले आहे. तर मध्य वैतरणा धरणही ९६ टक्के भरले असून लवकरच हे तलाव भरल्यानंतर यातील पाणी अप्पर वैतरणात सोडले जाणार असून यामुळे अप्पर वैतरणा धरणही लवकरच भरु शकेल असा विश्वास निवृत्त जलअभियंत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता प्रशासनाला पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. एका बाजुला पाणीकपातीमुळे अनेक जलाशयांमधील पाण्याची पातळी वाढत नाही. परिणामी योग्य दाबाने पाण्याचा पुरवठा होत नसल्याने शेवटच्या बाजुला असणाऱ्या नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळ पावसाचा अजून दीड महिना लक्षात घेता आता ही कपात मागे घेऊन शक्य तेवढी पाणी समस्येबाबत असलेली ओरड दूर करता येवू शकते असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

०५ ऑगस्ट पर्यंतचा पाणी साठा

२०२३ : ११ लाख ५७ हजार ९१९ दशलक्ष लिटर्स (८०.०० टक्के)

२०२२: १२लाख ९९ हजार ४२१ दशलक्ष लिटर्स (८९.७८ टक्के)

२०२१: ११ लाख ४९ हजार ९७१ दशलक्ष लिटर्स (७९.४५ टक्के )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.