Mumbai Local: सापाच्या अफवेने लोकलला चार वेळा ब्रेक, ठाण्यात भीतीपोटी चेन पुलिंग; पुढे काय झालं? वाचा

57
Mumbai Local Crime : बोरिवलीत जागेवरून वाद; प्रवाशाला धावत्या लोकलमधून ढकलले

Mumbai Local: मुंबई – महिला डब्यात साप असल्याच्या अफवेने डोंबिवली-सीएसएमटी धीमी लोकलला शुक्रवारी सकाळी चार वेळा थांबावे लागले. ठाण्यात सापाच्या भीतीने प्रवाशांनी चेन पुलिंग केल्याने लोकल १२ मिनिटे थांबली. त्यानंतर मुलुंड आणि नाहूर येथेही लोकल थांबली. अखेर कुर्ल्यात खबरदारी म्हणून महिला डब्यातील प्रवाशांना उतरवून सर्पमित्रांकडून तपासणी करण्यात आली. मात्र, साप आढळला नाही.

या प्रकारामुळे मागून येणाऱ्या लोकलमध्ये गर्दी वाढली. सकाळच्या कार्यालयीन वेळेत झालेल्या या खोळंब्यामुळे अनेक मुंबईकरांना लेटमार्कचा सामना करावा लागला. अप धीम्या मार्गावरील सुमारे २० लोकलच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम झाला.

हेही वाचा – Hinjawadi Murder Case : शाळेतलं प्रेम, पुण्यातला पीजी अन् रॉडने १४ वार; लव्ह ट्रँगलमधून पुण्यात तरुणाची निघृण हत्या

सकाळी ८.४१ वाजता डोंबिवलीहून सीएसएमटीकडे रवाना झालेली धीमी लोकल ९.१४ वाजता ठाणे स्थानकात पोहोचली. महिला डब्यात साप असल्याची अफवा पसरताच प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आणि चेन पुलिंग करण्यात आली. त्यामुळे लोकल ९.१४ ते ९.२६ या कालावधीत ठाण्यात थांबली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोच क्रमांक ५३४१/C मधील सेकंड क्लास महिला डब्याची तपासणी केली. मात्र, साप आढळला नाही.

मुलुंड, नाहूरमध्येही थांबा

ठाण्यातील तपासणीनंतर लोकल पुढे रवाना झाली. मात्र, मुलुंड येथे ९.३१ ते ९.३३ आणि नाहूर येथे ९.३६ ते ९.४० या वेळेत ती पुन्हा थांबली. त्यानंतर सकाळी १०.०७ वाजता लोकल कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर घेण्यात आली.

लोकलच्या या वारंवार थांब्यामुळे मागील लोकलच्या फेऱ्यांवर परिणाम झाला. ठाणे, मुलुंड, नाहूर आणि पुढील स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढत गेली. नेहमीच्या फेरीत चढता न आल्याने अनेकांना पुढील लोकल पकडावी लागली. त्यामुळे गर्दीच्या डब्यांत चढण्यासाठी प्रवाशांची धावपळ झाली. कार्यालयीन वेळेत झालेल्या या विलंबामुळे मुंबईकरांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला.

कुर्ल्यात महिला प्रवाशांना उतरविले

कुर्ल्यात लोकल १०.१९ वाजेपर्यंत थांबवून महिला डब्यातील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. रेल्वे प्रशासनाने सर्पमित्रांना पाचारण करून डब्याची सविस्तर तपासणी केली. सीटखाली आणि डब्याच्या विविध भागांत तपासणी करूनही साप आढळला नाही.

खबरदारी म्हणून महिला प्रवाशांना दुसऱ्या डब्यातून प्रवास करण्याची विनंती करण्यात आली. काही महिला त्याच डब्यातून प्रवास करण्यावर ठाम राहिल्या. त्यामुळे सुरक्षेसाठी दोन महिला आरपीएफ जवानांची डब्यात नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या बंदोबस्तात लोकल सीएसएमटीकडे रवाना झाली. पुढील प्रवासात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

मात्र, एका अफवेमुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकल सेवा विस्कळीत झाली. मागील लोकलमध्ये गर्दी वाढल्याने प्रवाशांना चढण्यासाठी कसरत करावी लागली, तर स्थानकांवरही मोठी गर्दी झाली. सुमारे २० लोकल उशिराने धावल्याने अनेक मुंबईकरांना लेटमार्कचा सामना करावा लागला.

घटना क्रम

– ८.४१ : डोंबिवलीहून लोकल रवाना

– ९.१४ ते ९.२६ : ठाण्यात भीतीपोटी चेन पुलिंग; १२ मिनिटे थांबली

– ठाणे : महिला डब्याची तपासणी; साप आढळला नाही

– ९.३१ ते ९.३३ : मुलुंड येथे थांबली

– ९.३६ ते ९.४० : नाहूर येथे थांबली

– १०.०७ ते १०.१९ : कुर्ल्यात प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबवून महिला प्रवाशांना उतरविले

– कुर्ला : सर्पमित्रांकडून तपासणी; साप आढळला नाही

– त्यानंतर : दोन महिला आरपीएफ जवानांचा डब्यात बंदोबस्त

– परिणाम : सुमारे २० लोकल सेवांना विलंब; प्रवाशांची धावपळ आणि मुंबईकरांना लेटमार्क

 हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.