Kuala Lumpur: मलेशियात ‘महाराष्ट्र मंडळा’चा गणेशोत्सव भक्तिभाव आणि उत्साहात साजरा

8
Kuala Lumpur: मलेशियात 'महाराष्ट्र मंडळा'चा गणेशोत्सव भक्तिभाव आणि उत्साहात साजरा
Kuala Lumpur: मलेशियात 'महाराष्ट्र मंडळा'चा गणेशोत्सव भक्तिभाव आणि उत्साहात साजरा

Kuala Lumpur: ‘महाराष्ट्र मंडळ मलेशिया’तर्फे गणेशोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. SDSKL श्री लक्ष्मी नारायण मंदिर, सेन्तुल येथे आयोजित या सोहळ्यास ५५० हून अधिक भाविकांची उपस्थिती लाभली. मलेशियात वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांसह विविध भारतीय समुदायांनीही या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमास भारताचे मलेशियातील उपउच्चायुक्त हितेश राजपाल आणि त्यांच्या पत्नी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गणरायाचे आगमन व पूजन करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष मान लाभला.

हेही वाचा  – Ulhas River : एंटीलिया घाटामुळे उल्हास नदीला प्रदूषणाचा धोका; महापालिकेचा आदेश ठरतोय निर्णायक

पारंपरिक ढोल-ताशा आणि झेंडा पथकाच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा निनाद, भगव्या झेंड्यांची दिमाखदार मिरवणूक आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाला. महाराष्ट्राच्या पारंपरिक उत्सवाचे दर्शन घडवणाऱ्या या मिरवणुकीत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

भारताचे रंग, बाप्पाचे संग…

यंदाच्या गणेशोत्सवाची संकल्पना ‘भारताचे रंग, बाप्पाचे संग’ अशी होती. भारताच्या विविध राज्यांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा परिचय या संकल्पनेच्या माध्यमातून करून देण्यात आला. विविधतेतून एकतेचा संदेश देणाऱ्या या संकल्पनेला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात मुलांनी आणि तरुणांनी विविध राज्यांच्या सांस्कृतिक परंपरांना साजेशी नृत्ये, नाटिका आणि सांस्कृतिक सादरीकरणे केली. या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीची समृद्ध विविधता आणि गणेशोत्सवाशी जोडलेली श्रद्धा प्रभावीपणे मांडण्यात आली.

मलेशियाच्या भूमीत मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या महाराष्ट्र मंडळ मलेशियाच्या प्रयत्नांना या गणेशोत्सवामुळे नवी ऊर्जा मिळाली. भक्ती, परंपरा, कला आणि सामुदायिक एकतेचा सुंदर संगम घडवणारा हा गणेशोत्सव सर्व सहभागींसाठी संस्मरणीय ठरला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.