Rent a Garba Partner : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर गरब्यासाठी जोडीदार भाड्याने देण्याचा नवा आणि वादग्रस्त ट्रेंड सुरू असल्याचे समोर आले आहे. ‘Rent a Garba Partner’ (भाड्याने गरबा पार्टनर मिळवा) या नावाखाली सोशल मीडियावर सुरू असलेल्या या गैरप्रकाराची गंभीर दखल घेत, बोरीवली विधानसभेचे आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबई पोलिसांकडे तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची लेखी मागणी केली आहे.
या संदर्भात आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबई पोलीस आयुक्त तसेच परिमंडळ ११ आणि १२ च्या पोलीस उपायुक्तांना २१ सप्टेंबर रोजी पत्र पाठवून तक्रार दाखल केली आहे. या पत्राच्या प्रती बोरीवली, कांदिवली, चारकोप, गोराई, समतानगर, कस्तुरबा मार्ग, एमएचबी आणि दहिसर पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – Ulhas River : एंटीलिया घाटामुळे उल्हास नदीला प्रदूषणाचा धोका; महापालिकेचा आदेश ठरतोय निर्णायक)
नवरात्रीत एकटे नाचू नका, असे सांगत इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर काही जाहिराती व्हायरल होत आहेत. यामध्ये तरुण-तरुणींना १,००० ते ६,५०० पर्यंतच्या वेगवेगळ्या पॅकेजेसवर (सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम, डायमंड) गरबा पार्टनर म्हणून उपलब्ध करून देण्याचे दावे केले जात आहेत. या पॅकेजेसमध्ये एकत्र गरबा खेळणे, मॅचिंग कपडे घालणे, इन्स्टाग्राम रील्स बनवणे, खोट्या ओळखीची पार्श्वभूमी सांगणे आणि सोबत घरी सोडणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असल्याचा प्रचार सोशल मीडियावर उघडपणे सुरू आहे.
महिलांची सुरक्षितता आणि फसवणुकीचा धोका
या प्रकारावर आमदार संजय उपाध्याय यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, अशा उपक्रमांच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन, महिलांची फसवणूक, गैरवापर किंवा अनैतिक व बेकायदेशीर प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे परिसरातील महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अशा जाहिराती देणारे, आयोजक आणि संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयास सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नवरात्रीसारख्या पवित्र आणि सांस्कृतिक उत्सवाच्या नावाखाली अशा प्रकारचा व्यावसायिक आणि अनैतिक बाजार मांडणाऱ्यांवर मुंबई पोलीस आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

