MSRTC चे दर करार रखडले; सुट्या भागांच्या स्थानिक खरेदीत कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप

महामंडळाच्या (MSRTC)  मालकीच्या १४,४३२ बसेसपैकी सुमारे १३,००० बसेस दररोज रस्त्यावर धावत असल्याने त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी विविध प्रकारचे सुटे भाग आणि साहित्य सातत्याने आवश्यक असते.

72

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसच्या दैनंदिन देखभाल व दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या सुट्या भागांच्या खरेदीसाठीचे नियमित दर करार रखडल्याने स्थानिक पातळीवरील खरेदीत मोठी वाढ झाली असून, त्यातून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

बरगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निविदा प्रक्रियेद्वारे स्पर्धात्मक दर निश्चित करून होणारी केंद्रीकृत खरेदी रखडल्यामुळे विभागीय कार्यशाळा, आगार आणि मध्यवर्ती कार्यशाळा स्तरावर मोठ्या प्रमाणात स्थानिक खरेदी करण्यात आली. या खरेदीपैकी काही खरेदी दर योग्य प्रमाणात दिसत असून  काही व्यवहारांमध्ये मात्र साहित्य चढ्या दराने खरेदी करण्यात आल्याचा आरोप बरगे यांनी केला असून गेल्या सहा महिन्यांत सुट्या भागांच्या खरेदीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत .या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

(हेही वाचा भारत-अफगाणिस्तान जवळीकीमुळे Pakistan बिथरला; लष्कराच्या प्रवक्त्याकडून वादग्रस्त वक्तव्य)

महामंडळाच्या (MSRTC)  मालकीच्या १४,४३२ बसेसपैकी सुमारे १३,००० बसेस दररोज रस्त्यावर धावत असल्याने त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी विविध प्रकारचे सुटे भाग आणि साहित्य सातत्याने आवश्यक असते. या साहित्याच्या खरेदीसाठी महामंडळाकडून (MSRTC)  निविदा प्रक्रिया राबवून साधारणपणे वर्षभरासाठी दर करार निश्चित केले जातात. त्यानुसार संबंधित पुरवठादारांकडून निश्चित दराने साहित्याचा पुरवठा केला जातो. या प्रक्रियेमुळे खरेदीत एकसमानता, स्पर्धात्मक दर आणि आर्थिक शिस्त राखली जाते. मात्र, व्यवस्थापनाने गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून नवीन दर करार केले नसून सहा महिन्यांपूर्वी १४ पुरवठादारांनी सुमारे ५५ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या दर कराराच्या निविदा भरूनही वाणिज्य निविदा उघडल्यानंतर नियमानुसार त्यावर सहा महिन्यांच्या आत निर्णय न झाल्याने वैधता कालावधी संपला व दर करार झालेच  नाहीत. हा व्यवस्थापनाचा हलगर्जीपना व बेफिकीरी असून या मुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. वेळेत दर करार का झाला नाही? याची  चौकशी करण्यात आली पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.

दर करार न झाल्याने दैनिक देखभाली मध्ये सामाना अभावी गाड्या मार्गावर न जाता थांबतील व प्रवाशांची गैरसोय होईल, अशी वरिष्ठ व्यवस्थापनाला भिती दाखवत स्थानिक पातळीवर सामान खरेदी करण्याची नामी संधी काही विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली व  त्यामुळे स्थानिक खरेदीत मोठी वाढ झाली, व दर करारापेक्षा ३० टक्के जादा दराने खरेदी करण्यात आली असून वाढलेल्या खर्चाची स्वतंत्र चौकशी करून गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे. (MSRTC)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.