सर्व मतप्रवाह सामावून घेणारा हिंदू धर्म तरूणाईपर्यंत पोहोचवा; Dr. Dhanashree Lele यांचे आवाहन

85
सर्व मतप्रवाह सामावून घेणारा हिंदू धर्म तरूणाईपर्यंत पोहोचवा; Dr. Dhanashree Lele यांचे आवाहन
सर्व मतप्रवाह सामावून घेणारा हिंदू धर्म तरूणाईपर्यंत पोहोचवा; Dr. Dhanashree Lele यांचे आवाहन
  • कल्याण : प्रतिनिधी

एखाद्याला मारणे म्हणजेच हिंसा ही व्याख्या खूप वरवरची आहे. कोणतीही सुविहित चौकट मोडणे म्हणजे हिंसा होय. सिग्नल तोडणे ही सुद्धा हिंसा आहे. त्या चौकटीच्या रक्षणासाठी शस्त्र हातात धरणे हा धर्म आहे, ती हिंसा नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे की, ज्याचे त्याला मिळावे ही धर्माची चौकट आहे. कौरवांनी ती तोडली. ती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी युद्ध करणे पाप नाही, असे परखड प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका डॉ. धनश्री लेले (Dr. Dhanashree Lele) यांनी डोंबिवलीत (Dombivli) बोलताना केले.

1004605352

ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक माधव जोशी (Madhav Joshi) यांच्या वैदिक हिंदू ग्रंथपरंपरा स्वरूप, सार आणि संवाद, या ग्रंथाली प्रकाशित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. धनश्री लेले (Dr. Dhanashree Lele) यांनी उपस्थित डोंबिवलीकरांशी संवाद साधला. बोडस सभागृहात (Bodas Sabhagruh) शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला डोंबिवलीकर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू धर्म म्हणजे नेमके काय ? या विषयावर डॉ. धनश्री लेले यांनी सोदाहरण मार्गदर्शन केले.

(हेही वाचा – CWG 2026 : स्कॉटलँडने भारताच्या नकाशातून ईशान्य भारतच केला गायब; भारतीय बॉक्सर संतापली! Video Viral)

जीवन बदलून टाकण्याची ताकद आपल्या वैदिक हिंदू ग्रंथ परंपरेत आहे आणि ती आपल्याला योग्य ते प्रश्न विचारायला शिकवते, असे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. धनश्री लेले म्हणाल्या, “विश्वबंधुत्वाचे आणि सुसंस्कारांचे अधिष्ठान असलेला, नित्य विस्तारणारा, सर्व मतप्रवाह सामावून घेणारा विशाल हिंदू धर्म आपण तरुण पिढीपर्यंत पोहोचविला पाहिजे. हे पुस्तक त्या दृष्टीने मोठी मदत करेल. कारण ते हिंदू ग्रंथपरंपरेचे स्वरूप आणि सार सोप्या आणि नेमक्या भाषेत मांडते. तसेच संविधानाशी सुंदर संवाद साधत आजच्या काळाशी सुसंगत अशी या ग्रंथपरंपरेची ओळख करून देते, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी ग्रंथालीचे ज्येष्ठ विश्वस्त प्रभाकर भिडे यांनी पुस्तकाचा आढावा घेतला. ग्रंथालीने दीड हजार पुस्तकांच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे विचार वाचकांसमोर ठेवले आहेत, असे त्यांनी सांगितले. सुदेश हिंगलासपूरकर यांनी ग्रंथालीच्या अर्धशतकी वाटचालीचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कथक नृत्यगुरू आणि संशोधक ॲड. सुनीला पोतदार यांनी केले. त्यांच्या शिष्यांनी दिंडीतून नृत्य करीत पुस्तके मंचावर आणली. अबोली ठोसर यांनी ईशस्तवन सादर केले. तर सुरेखा जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बोडस सभागृह रसिक श्रोत्यांनी खचाखच भरले होते. मंथन व्याख्यानमालेने या सोहळ्याचे आयोजन केले होते. मंथन व्याख्यानमालेतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री लक्ष्मी नारायण संस्था, सवाई ८३, मधुमालती एंटरप्रायझेस या सहभागी संस्थांचे कार्यकर्ते, तसेच प्रवीण दुधे, दीपक काळे, संदीप वैद्य आणि आदित्य बिवलकर यांचा आयोजनात सक्रिय सहभाग होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.