- कल्याण : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ठाणे विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर अखेर तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाने ठाणे विभागाचे नवनियुक्त विभाग नियंत्रक कैलास पाटील (Kailas Patil) यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताच्या नऊ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये गर्दीच्या हंगामात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विभागीय विनंती बदल्या तातडीने पूर्ण कराव्यात, स्वच्छता करारानुसार राज्यातील प्रत्येक आगारात प्रवाशांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. विमानतळ (Airport) परिसरात कार्यरत असणाऱ्या बुकिंग वाहकांसाठी स्वतंत्र केबिनची सोय करण्यात यावी, वाडा बस स्थानकावर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी लवकरात लवकर स्वच्छतागृह सुरू करण्यात यावे, सर्व नियमित फेऱ्यांसाठी प्रवाशांच्या सोयीकरिता बसेस वेळेवर उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या. याशिवाय नैसर्गिक कारणांमुळे बसमार्गात तात्पुरता बदल झाल्यास त्याबद्दलचे स्पष्ट सूचना फलक व्ही केबिन, तसेच संबंधित प्रमुख ठिकाणी तातडीने लावण्यात यावेत. कोरोना महामारीच्या कालावधीतील नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचा प्रलंबित कोरोना भत्ता कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.
(हेही वाचा – भारत-अफगाणिस्तान जवळीकीमुळे Pakistan बिथरला; लष्कराच्या प्रवक्त्याकडून वादग्रस्त वक्तव्य)
नवनियुक्त विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी कर्मचारी सेनेच्या वतीने मांडण्यात आले सर्व मुद्दे अत्यंत आस्थेने ऐकून घेतले. कर्मचारी हेच एसटीचे खरे आधारस्तंभ आहेत. आपण मांडलेल्या सर्व न्याय्य मागण्यांवर नियमानुसार लवकरात लवकर योग्य कार्यवाही केली जाईल. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना दिला.
राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या विभागीय कार्यकारिणीने विभाग नियंत्रकांच्या या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. आगामी काळात या सर्व मागण्यांवर ठोस निर्णय होऊन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

