FDA चा राज्यभरात ‘महाछापा’! नागपुरात १२ लाखांचा गुटखा पकडला; मुंबईतील १४ आस्थापनांचे परवाने निलंबित

10
FDA
FDA
  • प्रतिनिधी

FDA : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर, अस्वच्छ आणि बेकायदेशीर अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संपूर्ण महाराष्ट्रात धडक मोहीम राबवत जोरदार दणका दिला आहे. राज्यभरात एकाच दिवशी २७ हॉटेल्स आणि धाब्यांची झाडाझडती घेत तब्बल १४ आस्थापनांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत, तर १३ जणांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नागपूर विभागात तब्बल १२.१० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून ३ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या, तर मुंबई, कोकण, पुणे, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातून लाखो रुपयांचा संशयास्पद खवा, मावा, मिठाई व अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

(हेही वाचा – मराठवाडा दुष्काळमुक्त करणार; CM Devendra Fadnavis यांचा पुनरुच्चार )

कुलाबा येथील ‘ऑलिम्पिया कॉफी हाऊस’वर कारवाई; अन्नसाठवणुकीत थेट मूत्रालय!

‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत आलेल्या ग्राहक तक्रारीवरून दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध कुलाबा येथील ‘ऑलिम्पिया कॉफी हाऊस’वर FDA अधिकाऱ्यांनी छापा टाकला. तपासणीत उघडकीस आलेली भयानक स्थिती पाहून अधिकारीही चक्रावून गेले. अन्नसाठवणूक क्षेत्रातच मूत्रालय, जमिनीवर अन्न हाताळणी, झुरळे व माशांचा सुळसुळाट, रेफ्रिजरेटरमध्ये मांसाच्या रक्ताचे अवशेष आणि अत्यंत अस्वच्छ पाणी आढळले. ३५ पैकी ३४ कर्मचाऱ्यांकडे अन्न सुरक्षेचे कोणतेही प्रशिक्षण नव्हते. जनआरोग्यास गंभीर धोका निर्माण केल्याप्रकरणी या आस्थापनेचा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करून कामकाज पूर्णतः बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत ‘ब्लिंकिट’सह नामवंत कॅन्टीन व स्वीट्स दुकाने रडारवर

मुंबई विभागात अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७ आस्थापनांचे परवाने थेट निलंबित करण्यात आले:

नायर हॉस्पिटल कॅन्टीन (मुंबई सेंट्रल): रुग्णांच्या आरोग्याशी हेळसांड करणाऱ्या कॅन्टीनचा परवाना अस्वच्छतेमुळे तत्काळ निलंबित.

Blink Commerce Pvt. Ltd. (ब्लिंकिट, चेंबूर): शेड्युल ४ मधील स्वच्छता व आरोग्य मानकांचे गंभीर उल्लंघन केल्याने कारवाई.

विश्वास स्वीट्स अँड स्नॅक्स (घाटकोपर पश्चिम) व ए-१ जनरल अँड ड्रायफ्रुट्स (विद्याविहार): परवाने निलंबित.

मिलन पंजाब (वरळी) व सद्गुरू स्वीट्स (मालाड पूर्व): अन्न सुरक्षा मानकांचा फज्जा उडवल्याने विक्री बंदचे आदेश.

नागपुरात गुटखामाफियांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ अटकेत

नागपूर विभागात गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली. तीन ठिकाणी छापे टाकून ₹४,१०,७८२ किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ₹८ लाख किमतीची २ वाहने असा एकूण ₹१२.१० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ३ एफआयआर (FIR) दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. नागपुरातील ‘सुपरबेकर’ (धरमपेठ) आणि ‘सुराही रेस्टॉरंट अँड बार’ (नंदनवन) चे परवानेही अस्वच्छतेप्रकरणी निलंबित करण्यात आले.

सणासुदीच्या तोंडावर लाखो रुपयांचा संशयास्पद खवा व मिठाई जप्त

ठाणे / पालघर (कोकण विभाग): काशिमीरा (मीरा रोड) येथे दोन ट्रॅव्हलर वाहनांतून अत्यंत अस्वच्छ व असुरक्षितपणे वाहतूक होणारा तब्बल ₹५.८६ लाखांचा सैल खवा व गोड मावा जप्त करण्यात आला. चारोटी टोल नाक्यावर एका ट्रॅव्हल्सच्या वाहनातून ₹४८,७२० चा संशयास्पद गोड मावा पकडला.

छत्रपती संभाजीनगर: पंचवटी हॉटेलच्या पार्किंगजवळ विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला १,२२१ किलो संशयास्पद व भेसळयुक्त मिठाईचा साठा (किंमत ₹१.९२ लाख) जप्त करण्यात आला.

पुणे व पश्चिम महाराष्ट्र: विष्णू स्वीट्स (कराड) येथून १२६ किलो विनालेबल मिठाई, अमावा मिल्क (आकिवट, कोल्हापूर) येथून १९७ किलो खवा व रबडी, मौर्या नमकीन (सांगली) येथून २६८ किलो स्नॅक्स, तर अहिल्यानगर व नाशिकमधून संशयास्पद मिठाई, गूळ व तुपाचा साठा जप्त करण्यात आला. पुण्यात रंगला पंजाब (पाषाण) आणि मनीषा डोसा सेंटर (कर्वेनगर) चे परवानेही निलंबित करण्यात आले.

“जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही!” — तुकाराम मुंढे

“महाराष्ट्रात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि कायद्याच्या कठोर अंमलबजावणीबाबत शासन कोणतीही तडजोड करणार नाही. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या, मुदतबाह्य अथवा फेरफार केलेल्या अन्नपदार्थांची साठवणूक व विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; अशीच धडक कारवाई पुढेही सुरूच राहील.” — तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य

नागरिकांसाठी तक्रार निवारण कक्ष: अन्नपदार्थांतील भेसळ किंवा निकृष्ट दर्जाबाबत तक्रार नोंदवण्यासाठी एफडीएच्या टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर किंवा https://complaints.mahafda.in या पोर्टलवर थेट संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.