
Kokan Railway: गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच इंडियन रेल्वेने शनिवारी कोकणवासीयांना मोठी खूशखबर दिली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यास रेल्वे बोर्डाने अधिकृत मंजुरी दिली आहे. प्रस्तावित रेल्वेगाडी दररोज ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस’ (गाडी क्रमांक १५०८७) आणि ‘सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस’ (गाडी क्रमांक १५०८८) म्हणून धावणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्या तुलनेत नियमित रेल्वे गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या प्रत्येक गाडीत नेहमीच गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर नियमित गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, कोकण विकास समिती आणि महाराष्ट्र रेल्वे परिषद या संघटनांकडून वेळोवेळी पाठपुरावा सुरु आहे. वारंवारच्या मागणीची दखल घेत अखेर रेल्वे बोर्डाने सीएसएमटी ते सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान नवीन एक्सप्रेस सेवा चालवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सीएसएमटीहून कोकणातील सावंतवाडीला जाणाऱ्या या एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबा असणार आहे. दरम्यान, ही गाडी प्रत्यक्षात प्रवासी सेवेत कधी धावणार? गाडीची वेळ काय असेल, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून घोषणा करण्यात आलेली नाही.
रेल्वे बोर्डाने नवीन एक्सप्रेसला मंजुरी दिल्याने रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी आनंद व्यक्त केला. सीएसएमटी ते सावंतवाडी रोड स्थानकांदरम्यान नियमित एक्सप्रेस चालवण्यात येणार असल्याने कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाने आम्हाला आनंद झाला आहे. आता रेल्वे प्रशासनाने दादर-रत्नागिरी गाडी सुरु करावी आणि आमचा आनंद द्विगुणित करावा, अशी प्रतिक्रिया अक्षय महापदी यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

