India-New Zealand FTA : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) लागू करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. न्यूझीलंडच्या संसदेत भारतासोबतच्या FTAची अंमलबजावणी करणारे विधेयक 93 विरुद्ध 29 मतांनी मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीनेही या विधेयकाला पाठिंबा दिला.
भारत आणि न्यूझीलंडने 27 एप्रिल 2026 रोजी या मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली होती. आता दोन्ही देशांमधील आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा करार ऑक्टोबर 2026 च्या उत्तरार्धात लागू होण्याची शक्यता आहे. भारताचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनीही FTA ऑक्टोबरच्या अखेरीस लागू होण्याची माहिती दिली आहे.
(हेही वाचा : शेतमाल विक्रीच्या बाजारातून आता Employment ची नवी बाजारपेठ; २०० बाजार समित्यांमध्ये महाकुंभाची तयारी)
न्यूझीलंडच्या 95 टक्के निर्यातीवरील शुल्क कमी किंवा रद्द होणार
या करारामुळे न्यूझीलंडमधून भारतात होणाऱ्या निर्यातीसाठी बाजारपेठेतील प्रवेश अधिक सुलभ होणार आहे. कराराच्या पहिल्याच दिवसापासून न्यूझीलंडच्या 57 टक्के निर्यातीवरील शुल्क शून्य होईल. पूर्ण अंमलबजावणीनंतर न्यूझीलंडच्या भारतातील सुमारे 95 टक्के निर्यातीवरील शुल्क रद्द किंवा लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
दुसरीकडे, भारतातून न्यूझीलंडला होणाऱ्या 100 टक्के निर्यातीला शुल्कमुक्त प्रवेश मिळण्याची तरतूद FTAमध्ये करण्यात आली आहे. यामुळे वस्त्रोद्योग, चामडे, पादत्राणे, अभियांत्रिकी वस्तू, प्रक्रिया केलेले अन्न आणि इतर श्रमप्रधान क्षेत्रांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत संधी वाढण्याची अपेक्षा आहे.
(हेही वाचा : China : नरेंद्र मोदी-शी जिंगपिंग यांच्या चर्चेत भारताचा तीन मुद्यांवर आग्रह; सीमाभागातील शांततेवर भर)
भारतात 20 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार
या FTAमधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पुढील 15 वर्षांत भारतात 20 अब्ज डॉलर्सच्या खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचे न्यूझीलंडचे उद्दिष्ट. ही रक्कम थेट सरकारी गुंतवणुकीची हमी नसून, न्यूझीलंडच्या खासगी क्षेत्रातील गुंतवणूक भारतात वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची बांधिलकी आहे. या गुंतवणुकीत पायाभूत सुविधा, उत्पादन, नवतंत्रज्ञान, डिजिटल सेवा, संशोधन आणि नवोन्मेष यांसारख्या क्षेत्रांना महत्त्व दिले जाणार आहे.
भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठीही संधी
भारत-न्यूझीलंड FTAमध्ये केवळ वस्तूंच्या व्यापारावरच भर देण्यात आलेला नाही. भारतीय विद्यार्थी आणि कुशल व्यावसायिकांसाठीही काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. STEM क्षेत्रातील भारतीय पदवीधरांना अभ्यासानंतर न्यूझीलंडमध्ये काम करण्याची संधी, तसेच 5,000 कुशल भारतीयांसाठी Temporary Employment Entry Visaची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय दरवर्षी 1,000 भारतीय तरुणांना Working Holiday Visa देण्याची तरतूद आहे.
(हेही वाचा : गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताची मोठी तयारी; LNG साठे, नवीन टर्मिनल्स आणि देशांतर्गत उत्पादनावर भर)
भारत-न्यूझीलंड व्यापाराला मिळणार चालना
न्यूझीलंडच्या अधिकृत माहितीनुसार, दोन्ही देशांमधील वार्षिक द्विपक्षीय व्यापार सुमारे NZ$3.95 अब्ज आहे. FTAमुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध आणखी विस्तारण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून विविध देशांसोबत व्यापार संबंध वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत न्यूझीलंडसोबतचा FTA हा भारताच्या व्यापक व्यापार भागीदारीतील आणखी एक महत्त्वाचा करार ठरतो.
हेही पाहा –
https://youtu.be/KExKK5zx_Kc


