‘मी ॲक्शन करणारा माणूस’

151

मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर असल्याची टीका बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने केली होती. तिच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला असून, कंगना रणौतचे डोके ठिकाणावर नाही तिच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. तिला जर मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिने एकदा पाकव्याप्त काश्मीर बघून यावे आणि तिथे चित्रीकरण करावे, मग तिला समजेल मुंबई आणि पाकव्याप्त काश्मीरमधला फरक, असे खासदार संजय राऊत म्हणाले. सुशांत सिंह राजपूत संशयित आत्महत्येप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौवत गेली अनेक दिवस ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकार, महाराष्ट्र पोलीस आणि बॉलिवूडवर टीका करत आहे. या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिल्यानंतर कंगनाने संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिली असल्याचेही ट्वीट केले होते.

काय म्हणाले नेमंक राऊत

“मुंबई पोलिसांचा अपमान केलेला चालणार नाही. मी कोणालाही पोकळ धमक्या देत नाही. मी ॲक्शन करणारा माणूस आहे. कंगना रणौतचे डोके ठिकाणावर नाही त्यामुळे तिच्यावर उपचार करणे गरजेचे आहे.” “यासंदर्भात राज्यातील आरोग्य विभाग योग्य खबरदारी घेईल,” असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

हा झाशीच्या राणीचा अपमान

मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर आहे, असे म्हणणाऱ्या कंगनाला इथले काही राजकीय पक्ष समर्थन देत आहेत. तर त्या राजकीय पक्षाने हे विसरता कामा नये की मुंबईकरांच्या मतांवर तुम्ही निवडून आलेला आहात. यापुढे महाराष्ट्रातली आणि विशेषता मुंबईतली मते मागण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नसल्याचे संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीला ठणकावून सांगितले आहे. भाजपा कंगनाला ‘झाशीची राणी’ म्हणतोय हा झाशीच्या राणीचा अपमान आहे, असेही ते म्हणाले. बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन संदर्भात कोणाकडे माहिती असेल तर त्यांनी मुंबई पोलीस आणि गृहविभागाला द्यावी गृहविभाग त्याच्यावर काम करेल. मुंबईत यायचं, इथे खायचे, इथे मोठे व्हायचे आणि मुंबईबाहेर जाऊन मुंबईला वाईट म्हणायचं ही प्रवृत्ती बरी नव्हे. महाराष्ट्रासाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे, त्यांचा अपमान होऊ देणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

कुणाच्या बापाची हिंमत असेल तर रोखून दाखवा

दरम्यान कंगणाने सोशंल मीडियावरून तिच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले असून, मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिंमत असेल तर रोखून दाखवा.’ असे कंगनाने धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच कंगनाने पुढे स्माईल अपलोड करत म्हटले आहे की, ९ सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईन. मुंबईत विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरून धमक्या देणाऱ्यांपैकी कुणामध्ये हिंम्मत असेल तर रोखून दाखवा असे खुल आव्हान कंगनाने दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.