३ जानेवारीपासून १५ वर्षांवरील मुलांचे लसीकरण! पंतप्रधानांच्या ‘त्या’ घोषणा कोणत्या?

62

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस देण्याचेही जाहीर केले. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ ३ जानेवारीपासून होईल, असे मोदी यांनी नमूद केले. तसेच आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाची महासाथ संपली नाही 

देशात कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी रात्री ९.४५ वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी ओमायक्रॉनच्या वेगवान संसर्गाबद्दल सतर्कतेच आवाहन नागरिकांना केले. मोदी म्हणाले की जगातील अनेक देशांत ओमायक्रॉनची साथ पसरली असून आपण घाबरून न जाता सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोनाची महासाथ अद्याप संपलेली नसल्याने आपल्याला आणखी खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशाच्या, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही निरंतर काम केले. आपल्या लसीकरण मोहिमेला ११ महिने पूर्ण होत असताना आपण लसीकरणाची व्याप्ती वाढवत आहोत, असे मोदी यांनी नमूद केले.

(हेही वाचा जळगावात महाआघाडीत बिघाडी! सेना-राष्ट्रवादी आमनेसामने)

९० टक्क्यांहून अधिक पात्र नागरिकांनी पहिली लसमात्रा 

कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजपर्यंत १४१ कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून ९० टक्क्यांहून अधिक पात्र नागरिकांनी पहिली लसमात्रा घेतली आहे. नव्या ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घाबरून जाऊ नका, मास्क वापरा आणि वारंवार हात निर्जंतुक करा, असे आवाहन मोदी यांनी नागरिकांना केले. देशात १८ लाख विलगीकरण खाटा, पाच लाख प्राणवायूयुक्त खाटा, एक लाख ४० हजार अतिदक्षता खाटा, मुलांसाठी ९० हजार खाटा आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. तसेच देशात ३००० प्राणवायूनिर्मिती केंद्रे असून देशभर चार लाख प्राणवायू र्सिंलडरचे वितरण करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.