सुरक्षेच्या नियमांकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका २१ वर्षीय तरुण महिला इन्फ्लुएन्सरला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना ब्राझीलमधील साओ पावलो राज्यात घडली आहे. बंजी जंपिंग (Bungee Jumping) करताना सुरक्षेसाठी आवश्यक असणारी मुख्य दोरी (कॉर्ड) बांधलीच नसल्याने, ही तरुणी सुमारे ४० मीटर खोल दरीत कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. मारिया एडुआर्डा रॉड्रिग्स असे मृत तरुणीचे नाव असून, ती ब्राझीलच्या लिमेरा शहरातील रहिवासी होती.
काय आहे नेमकी घटना?
मारिया ही साओ पावलो येथील एका प्रसिद्ध ॲडव्हेंचर स्पॉटवर बंजी जंपिंगचा (Bungee Jumping) थरार अनुभवण्यासाठी गेली होती. प्राथमिक तपासानुसार, ती जंपिंग प्लॅटफॉर्मवर उभी असताना तेथील कर्मचाऱ्यांनी तिच्या सुरक्षेची कोणतीही खातरजमा केली नाही. तिला कंबरेला मुख्य दोरी न बांधताच प्लॅटफॉर्मवरून खाली सोडण्यात आले. दोरी बांधली नसल्याचे लक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी ‘दोरी बांधली नाही, दोरी बांधली नाही!’ असा एकच आक्रोश केला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. मारिया थेट ४० मीटर उंचीवरून खाली कोसळली. घटनास्थळी उपस्थित कर्मचारी आणि अग्निशामक दलाने तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. (Bungee Jumping)
(हेही वाचा भारतीय लष्कराचे नवे नेतृत्व; लेफ्टनंट जनरल Dhiraj Seth यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती)
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या संपूर्ण दुर्घटनेचा एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये कर्मचारी मारियाला जंपिंग (Bungee Jumping) प्लॅटफॉर्मकडे घेऊन जाताना आणि त्यानंतर झालेल्या भोंगळ कारभाराचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मारिया ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. तिने नुकतेच फिजिकल एज्युकेशन आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले होते. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फिटनेस, निसर्ग आणि तिच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित पोस्ट शेअर करायची. तिच्या या अचानक जाण्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या अपघातानंतर मारियाच्या होणाऱ्या पतीला तीव्र मानसिक धक्का बसला असून, प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या निष्काळजीपणासाठी नेमके कोण जबाबदार आहे, हे शोधण्यासाठी लिमोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. (Bungee Jumping)
Join Our WhatsApp Community

