नालेसफाईच्या कामाला अखेर सुरुवात, यंदा होणार २६३ कोटींचा खर्च

81

मुंबईतील नालेसफाईच्या कामासाठी कंत्राटदारांची निवड झाल्यानंतर प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली असून ३१ मे पूर्वी निश्चित केलेल्या एकूण गाळाच्या परिमाणाच्या तुलनेत ८० टक्के गाळ काढण्याचे लक्ष्य पूर्ण केले जाईल, असा विश्वास पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मिठी नदीसह यासर्व नाल्यांच्या सफाई कामांसाठी विविध करांसह एकूण २६३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याबाबतची व्हीटीएस प्रणालीही कार्यान्वित झाल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे आदी भागांमधील मोठे नाले, छोटे नाले, पेटीका नाले तसेच रस्त्यालगतची पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारांमध्ये साचला जाणारा गाळ काढून साफ करण्यासाठी महापालिकेच्यावतीने दरवर्षी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येते. त्यामुळे यंदाही याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करून मिठी नदी तसेच या तिन्ही भागांमधील नाल्यांची सफाई करण्यासाठी कंत्राटदारांची निवड अंतिम करून प्रशासकांच्या मंजुरीनंतर कामाचे कार्यादेश देण्यात आले. यंदा या नालेसफाईच्या कामामध्ये पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील मोऱ्यांची अर्थात कल्व्हर्टच्या सफाईसाठी स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त केले असून यासाठी तब्बत साडेबारा कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

गाळ वाहून नेणाऱ्या डंपरचा मागोवा घेण्यासाठी वापरण्यात येणारी व्हीटीएस प्रणाली ही महापालिकेच्या सर्व्हर जोडण्यात येत असून ज्या ठिकाणी हा गाळ टाकला जाणार आहे, त्या डम्पिंग ग्राऊंडवर सीसीटिव्ही कॅमरे लावणे कंत्राटदाराला बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच डम्पिंग ग्राऊंडवर रिकामा करून येताना, रिकाम्या डंपरचे वजन करणेही कंत्राटराला बंधनकारक केले आहे.

मागील वर्षी मोठ्या आणि छोट्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी एकूण १६२ कोटी रुपयांचा खर्च झाला होता, त्यातुलनेत यंदा हा खर्च वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शहर भागातील नालेसफाईवर २०.३५ कोटी रुपये, पूर्व उपनगरांमधील नालेसफाईवर ६५.७६ कोटी रुपये आणि पश्चिम उपनगरांमधील सफाईवर ९०.९४ कोटी तसेच मिठी नदीच्या सफाईवर ८६.१४ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळालेली आहे.

पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता विभास आचरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील १६ मार्चपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून या कामाला आता गती येत असल्याचे सांगितले.

अशाप्रकारे होणारा नालेसफाईवर खर्च

शहर विभाग 

  • छोट्या आणि मोठ्या तसेच रस्त्यालगतच्या नालेसफाईवरील खर्च  : २० कोटी ३५ लाख रुपये
  • कोणत्या कंपन्यांची नियुक्ती : डिवाईन इन्फ्राटेक, एस.एम. डेव्हलपर्स, डि.बी. एंटरप्रायझेस

पश्चिम उपनगरे 

  • छोट्या व मोठ्या तसेच रस्त्यालगतच्या नालेसफाईवरील खर्च  : ९० कोटी ९४ लाख रुपये
  • कोणत्या कंपन्यांची नियुक्ती :भूमिका ट्रान्सपोर्ट, एन.एम. इन्फ्रास्ट्रक्चर, एस.के. डेव्हलपर्स, त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्ट्र, एम.बी. ब्रदर्स, एम. मोना एंटरप्रायझेस,  श्री साई इन्फास्ट्रक्चर, राठोड भाग्यजीत आणि कंपनी, कल्पेश कॉर्पोरेशन

पूर्व उपनगरे 

  • छोट्या व मोठ्या नाल्यांसह रस्त्यालगतच्या नालेसफाईवरील खर्च : ६५ कोटी ७६ लाख रुपये
  • कोणत्या कंपन्यांची नियुक्ती : राठोड भाग्यजीत आणि कंपनी, एन.एम. इन्फ्रास्ट्रक्चर, डी.बी. एंटरप्रायझेस,नैशा कंस्ट्रक्शन, तनिषा एंटरप्रायझेस, निखिल कंस्ट्रक्शन कंपनी, त्रिदेव इन्फ्रा प्रोजेक्ट
  • मिठीनदीच्या सफाईवरील खर्च :  ८६ कोटी १४ लाख रुपये
  • कोणत्या कंपन्यांची नियुक्ती : ऍक्यूट डिझाईन्स,त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्ट,भूमिका ट्रान्सपोर्ट

(हेही वाचा – महापालिका शाळांमधील मुलांच्या साहित्य खरेदीचा प्रशासनाचा अंदाज फसला: वाढीव साहित्याच्या खरेदीसाठी सुमारे साडेबारा हजारांचा खर्च)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.