Dombivli : मिलापनगर तलावाच्या बचावासाठी रहिवाशांचा आक्रमक पवित्रा; जलचरांच्या मृत्यूनंतरही केडीएमसीचे दुर्लक्ष

अखेर रहिवाशांनी स्वखर्चाने लावला सक्त सूचना इशाऱ्याचा फलक

118
Milapanagar Lake warning sign in Dombivli.
Dombivli : मिलापनगर तलावाच्या बचावासाठी रहिवाशांचा आक्रमक पवित्रा; जलचरांच्या मृत्यूनंतरही केडीएमसीचे दुर्लक्ष
  • डोंबिवली, प्रतिनिधी

Dombivli                 कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वारंवारच्या दुर्लक्षाला कंटाळून डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील मिलापनगरवासिय जागरूक रहिवाशांनी शेवटी स्वतःच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. तलावातील पाणी दूषित होऊन असंख्य जलचर अर्थात मासे मृत्युमुखी पडले, तरी प्रशासन केवळ तात्पुरती साफसफाई करून हात झटकत होते. याला कंटाळलेल्या स्थानिकांनी आता स्वतःचा खिसा रिकामा करून तलावावर सक्त सूचना इशाऱ्याचा फलक ठोकला आहे. प्रशासनाची वाट पाहत बसण्यापेक्षा आम्हीच कृती करू, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे. (Dombivli)

काही दिवसांपूर्वी मिलापनगर तलावात भाविक कसले? बेजबाबदार नागरिकांनी टाकलेल्या निर्माल्य, हार-फुलांच्या कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित झाले होते. त्यातच वाढलेला कडक उष्मा आणि पाण्यातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने खाली आल्याने जलचर-मासे मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत तलावातील पाण्यावर तरंगू लागले होते. मृत माशांचा खवट वास आणि तलावाची दुरावस्था पाहून परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला होता. केडीएमसी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत मासे आणि कचरा उचलला होता. आता तर या तलावाकडे केडीएमसीने सपशेल दुर्लक्ष केल्याचे साठलेल्या कचऱ्यातून दिसून येत आहे. (Dombivli)

(हेही वाचा – Tuljapur : तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन व्यवस्थेत मोठे बदल; काय आहेत नवीन नियम, घ्या जाणून)

तात्पुरती मलमपट्टी उपाय नव्हे

केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, पर्यावरणप्रेमी राजीव तायशेटे, विजय घोडेकर आणि राजू नलावडे यांच्या पुढाकाराने तलावात वॉटर पंपाद्वारे फवारा मारून पाण्याचे एरिएशन करण्यात आले होते. त्यामुळे काही जलचर वाचले आहेत. मात्र हा तात्पुरता उपाय ठरला. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय न केल्याने बेफिकिर नागरिक रोज तलावात निर्माल्य, प्लास्टिक, कचरा फेकत आहेत. काहीजण देवी-देवतांच्या मूर्ती-फोटोही तिथेच टाकून देत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही. (Dombivli)

भविष्यात तलावावर सीसीटीव्ही कॅमेरे

याच संतापातून स्थानिक जागरूक रहिवाशांनी स्वखर्चाने तलावावर मोठा फलक लावला आहे. तलावात कचरा, निर्माल्य, प्लास्टिक टाकणे सक्त मनाई आहे. देवी-देवतांच्या मूर्ती-फोटो ठेवू नयेत. उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल, असा ठळक इशारा फलकावर देण्यात आला आहे. निर्माल्यासाठी जवळच असलेल्या श्री गणेश मंदिर निर्माल्य खत प्रकल्पाचा वापर करावा, अशी पर्यायी व्यवस्थाही फलकावर सुचविण्यात आली आहे. भविष्यात तलावावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून बेशिस्त नागरिकांवर नजर ठेवण्याचा निर्धारही रहिवाशांनी व्यक्त केला आहे. (Dombivli)

(हेही वाचा – Parbhani Temple Collapse : मोठी दुर्घटना! सभामंडप कोसळला; ढिगाऱ्याखाली ३० ते ४० भाविक दबल्याची भीती)

पाण्याचा साठा नव्हे तर परिसराचे फुफ्फुस

केडीएमसीने फक्त साफसफाई करून आम्हाला गप्प केले. पण दररोज कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई कोण करणार? आम्ही कर भरतो, मग जबाबदारी आमचीच का? असा संतप्त सवाल स्थानिक रहिवासी असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केला आहे. पर्यावरणप्रेमी विजय घोडेकर म्हणाले, तलाव हा फक्त पाण्याचा साठा नाही, तर परिसराचे फुप्फुस आहे. ते वाचविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. रहिवाशांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनावर आता दबाव वाढला आहे. (Dombivli)

माणसं मेल्यावर प्रशासनाला जाग येईल का?

मिलापनगर तलावाला जीवदान द्यायचे असेल तर केडीएमसीने तातडीने तीन पावले उचलावीत, अशी कडक मागणी नागरिकांनी केली आहे. तलावाच्या तळाशी साचलेला गाळ स्लज पंपाने काढावा. २४×७ देखरेखीसाठी कंत्राटी कर्मचारी नेमावा. सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. रोटरी क्लब किंवा मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनकडे तलावाची देखभाल सोपविण्याचा प्रस्तावही केडीएमसीला देण्यात आला आहे. तलावाच्या परिसरात बंगले, बैठी घरे आणि बहुमजली सोसायट्यांमध्ये हजारोंच्या संख्येने कुटुंबे राहत आहेत. या तलावातील जलचर मेले तरी प्रशासन जागे होत नसेल, तर माणसे मेल्यावर जाग येईल का? असा संतप्त सवाल परिसरातील रहिवाशांनी केला आहे. (Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.