Dahisar West Skywalk : दहिसर पश्चिमच्या स्कायवॉकची पुनर्बांधणी की केवळ मलमपट्टी?

कंत्राटदाराकडून सुरु असलेल्या कामाकडे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

870
Dahisar West Skywalk : दहिसर पश्चिमच्या स्कायवॉकची पुनर्बांधणी की केवळ मलमपट्टी?

दहिसर पश्चिम येथील लोकमान्य टिळक मार्गावरील एमएमआरडीएकडून महापालिकेला हस्तांतरीत झालेली आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉकचे बांधकाम धोकादायक झाल्यामुळे याची पुनर्बांधणी आणि पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यामुळे सात जिन्यांसह स्कायवॉकचा डेक स्लॅब जीर्ण अवस्थेत असल्याने ते पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करून त्यावर तब्बल ३० कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार कामाला प्रत्यक्षात सरुवात झाल्यानंतरही केवळ डागडुजीचीच कामे केली जात असून जिन्यांचे पुनर्बांधकाम केले जात नाही. त्यामुळे प्रत्यक्षात फक्त थुकपट्टीच लावण्याचे काम नियुक्त कंत्राटदाराकडून सुरु आहे. मात्र, महापालिकेच्या पूल विभागाच्या अभियंत्यांचेही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने हे स्कायवॉक तोडून नव्याने बांधणार की केवळ वरवरची डागडुजी करणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (Dahisar West Skywalk)

स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी करण्यात आले होते बंद

दहिसर (पश्चिम) येथील एल.टी. मार्गवरील सध्या अस्तित्वात असलेली आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉक हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकण (एम. एम. आर. डी. ए) मार्फत सन २०१० साली बांधण्यात आले होते. हे स्कायवॉक सन २०१५ साली एम. एम. आर. डी. ए. कडून “जसे आहे तसे ” या तत्वावर मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यात आले होते. पण हे स्कायवॉक ताब्यात घेतल्यानंतर सन २०१६ मध्ये या स्कायवॉकचा काही भाग कोसळला गेला. त्यामुळे हे स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आले होते. (Dahisar West Skywalk)

स्कायवॉकच्या ८ पैकी ७ जीन्यांसह आकाशमार्गिकेचा डेक स्लॅब धोकादायक

त्यानंतर मुंबई व्हीजेटीआयचे प्रा. डॉ. अभय बांबोळे यांच्या मार्फत स्कायवॉकची संरचनात्मक तपासणी अहवाल सादर केला होता. त्यात स्कायवॉकच्या जीर्ण स्लॅब तोडून मुख्य संरचनात्मक दुरुस्ती करण्याचे सुचविले होते. परंतु या स्कायवॉकची दुरुस्ती वेळीच न झाल्याने पुन्हा या स्कायवॉकची तपासणी एस सी जी कन्सल्टन्सी सर्विसेस या सल्लागाराने ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी लेखापरिक्षण अहवाल केला त्या अहवालानुसार स्कायवॉकच्या ८ पैकी ७ जीन्यांसह आकाशमार्गिकेचा डेक स्लॅब धोकादायक अवस्थेत असल्याने ते बांधकाम पाडून त्याची पुनर्बाधणी करण्याची सल्लागाराने शिफारस केली. (Dahisar West Skywalk)

(हेही वाचा – BMC : गगराणींनी मिठी नदी, नाले सफाईसह पवई तलाव आणि भांडुप संकुलातील जलशुध्दीकरणाचीही केली पाहणी)

स्लॅब आतापर्यंत भगवान शांतीनाथ चौक ते दिपा बारपर्यंतच पूर्ण

त्यानसार महापालिकेच्या पूल विभागाने या स्कायवॉकचे बांधकाम तोडून त्याची पुनर्बांधणी ३० कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली होती. या कामांसाठी महापालिकेने स्वस्तिक कन्सल्ट्रक्शन या कंपनीची निवड केली होती. प्रत्यक्षात या कामाला ऑक्टोबर २०२३मध्ये मंजुरी मिळाल्यांनतर सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, आतापर्यंत स्कायवॉकचा डेक स्लॅब तोडून टाकून त्यावर फायबरचा स्लॅबचा वापर करून त्यावर रंगरंगोटी केली जात आहे. मात्र, हे स्लॅब आतापर्यंत भगवान शांतीनाथ चौक ते दिपा बारपर्यंतच पूर्ण झाले आहे आणि या पट्टयांत गुलाबी रंग लावून त्यावर रंगरंगोटी केली जात आहे. मात्र या पट्टयातच दोन जिने येत असून त्यावर स्टिल पाईप लावले जात आहेत. पण प्रत्यक्षात हे जिने तोडून नव्याने बांधणे आवश्यक असताना त्यावर स्टिलचे पाईप लावले जात असल्याने नक्की जिने तोडून त्यांचे पुनर्बांधकाम केले जाणार आहे की केवळ मलमपट्टीच करून पुनर्बांधणी केल्याचे दाखवून याचा पैसा खिशात घातला जाणार आहे,असा प्रश्न आता रहिवाशांना पडला आहे. (Dahisar West Skywalk)

पहिल्या सहा महिन्यांचा कालावधी असाच गेला

येथील दुकानदारांच्या म्हणण्यानुसार या स्कायवॉकचे काम प्रत्यक्षात फेब्रुवारी, मार्च महिन्याच्या आसपास सुरु झाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात याला मंजुरी मिळाल्यानंतर पावसाळ्यानंतर कामांना गती देणे अपेक्षित असताना कंत्राटदाराकडून धिम्यागतीने आणि योग्यप्रकारे काम केले जात नसल्याचे बोलले जात आहे. पावसाळ्यासह १५ महिन्यांचा कालावधी असला तरी पहिल्या सहा महिन्यांचा कालावधी असाच गेला आहे. येथील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या स्कायवॉकचा काहीही उपयोग नसून केवळ यावरील सुमारे ३० कोटींचा खर्च हा वायफळ आहे. या स्कायवॉकचा वापर रेल्वे प्रवाशांकडून किंवा पादचाऱ्यांकडून होत नसून याचा वापर केवळ प्रेमीयुगुलांकडून केला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे. (Dahisar West Skywalk)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.