कोविड मृत्यू : महापालिकेच्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारस ५७ नातेवाईकांना ९ महिन्यांमध्ये ५० लाख रुपयांचे सानुग्रह

128

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या महापालिकेच्या कामगार, कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आल्यानंतर आतापर्यंत ५७ मृतांच्या वारसांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र, यासाठी तरतूद केलेला सुमारे २८ कोटी रुपयांचा निधी संपला असून उर्वरीत दावे निकालात काढण्यासाठी अतिरिक्त सहा कोटींची गरज असून हा अतिरिक्त निधीही प्रशासकांनी मंजूर करून दिला आहे. त्यामुळे उर्वरीत २४ दाव्यांपैकी १२ दाव्यांची रक्कम मार्चपूर्वी देण्यात येणार असल्याने हा सहा कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केल्याची माहिती मिळत आहे.

८१ मृतांचे दावे प्रलंबित होते

मुंबईमध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महापालिकेचे सुमारे २२५ कर्मचारी मृत्यू पावले. यापैकी महापालिका सेवांमध्ये असताना कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मार्च २०२२ पूर्वी ५० लाख रुपयांचा लाभ दिल्यानंतर, ८१ मृतांचे दावे प्रलंबित होते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत कोविडमुळे मृत्यू पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यासाठी महापालिकेने २८ कोटी ८४ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता.

(हेही वाचा मला जेलमध्ये टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंची मूकसंमती होती; देवेंद्र फडणवीसांचा आरोप)

६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला

त्यातील एप्रिल ते १५ डिसेंबर २०२२ पर्यंत ५७ मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्यात आली आहे. यासाठी तरतूद केलेला निधी संपल्याने उर्वरीत २४ मृतांच्या नातेवाईकांचे दावे प्रलंबित आहे. त्यातील १२ दावे ३१ मार्च २०२३ पर्यंत निकालात काढले जाणे अपेक्षित असल्याने महापालिका प्रशासनाने यासाठी आवश्यक असलेल्या ६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. त्यामुळे १२ दाव्यांसंदर्भात वाद निर्माण झालेले असल्याने याबाबतचा निर्णय मार्च नंतर घेणे अपेक्षित मानले जात आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत ५७ अधिक १२ अशाप्रकारे ६९ मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.