BMC : आता भांडुपकरांचा चार किलोमीटरच्या प्रवासाचा वळसा वाचणार; महापालिका बांधतेय भांडुप पूर्व- पश्चिमेला जोडणारे पूल

235

भांडुपमध्ये पूर्व आणि पश्चिम जोडणारा रस्ता नसल्याने मुलुंड गोरेगाव लिंक रोड किंवा विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड या मार्गाने जावून पूर्व किंवा पश्चिम दिशेला जावे लागते. त्यामुळे भांडुपकरांना होणारा वळणाचा प्रवास कमी करण्यासाठी भांडुप पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेने (BMC) घेतला असून यासाठी कंत्राटदाराचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे तीन वर्षांच्या कालावधीत या पुलाचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित मानले जात आहे.

भांडुप पूर्व व पश्चिम दिशेला जोडणाऱ्या रस्त्यावर पूल नसल्याने भांडुपमधील जनतेला तब्बल चार किलोमीटर लांबीचा वळसा घालून प्रवास करावा लागतो. हा प्रवास कमी व्हावा म्हणून भांडुप पूर्व ते भांडुप पश्चिम या पुलाचे बांधकाम व्हावे यासाठी स्थानिक खासदार मनोज कोटक यांचा महापालिकेसोबत (BMC) वारंवार पाठपुरावा सुरु होता. ईशान्य मुंबईतील महापालिका आणि रेल्वे संदर्भातील रखडलेल्या कामांसंदर्भात कोटक हे सातत्याने पाठपुरावा करत असल्याने अखेर या पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामाचा आराखडा बनवल्यानंतर तांत्रिक सल्लागाराने बनवलेल्या या पुलाच्या आराखड्याला महापालिका आयुक्त तथा प्रशासक आणि मध्य रेल्वे विभागाने मंजुरी दिल्यांनतर याबाबतच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या.

(हेही वाचा Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकावरील गर्दीची कोंडी लवकरच फुटणार; काय होणार बदल ?)

या पुलाच्या बांधकामासाठी जानेवारी २०२३ मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात निविदा उघडून कमी बोली लावणाऱ्या कंत्राट कंपनीची निवड केली. यामध्ये आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली असून या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित रकमेपेक्षा उणे साडेबारा टक्के बोली लावून काम मिळवले. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे १०६ कोटी रुपये आणि कंपोझीट कंबाईन टेक्नोक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सल्लागार शुल्क म्हणून १ कोटी ३९ लाख रुपये एवढे मोजले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.