Bharat Vikas Parishad : वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारत विकास परिषदेचा पुढाकार; विलेपार्ल्यातील महानगरपालिका शाळेची स्वीकारली जबाबदारी

या उपक्रमामुळे सुमारे २०० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळणार आहे

113
Members of Bharat Vikas Parishad at a school event.
Bharat Vikas Parishad takes responsibility for a local school.

मुंबई : समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याच्या उद्देशाने, भारत विकास परिषदेच्या (Bharat Vikas Parishad) विलेपार्ले शाखेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पार्ले पूर्व येथील शहाजीराजे महानगरपालिका इंग्रजी शाळा दत्तक घेत, २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या प्रशासनाची जबाबदारी स्वीकारली आहे. या उपक्रमामुळे सुमारे २०० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळणार आहे.

भारत विकास परिषद ही, १९६३ साली स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी स्थापन झालेली अग्रगण्य स्वयंसेवी सामाजिक-सांस्कृतिक संस्था आहे. समाजातील बुद्धिजीवी आणि सुशिक्षित नागरिकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये सेवा, संस्कार आणि राष्ट्रनिर्माणाची भावना जागृत करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. गरीब, दिव्यांग, अशिक्षित आणि वंचित घटकांची सेवा ही दानधर्म म्हणून नव्हे, तर भारतीय संस्कृतीतील कर्तव्यभावनेतून व्हावी, हा परिषदेचा मूलभूत विचार आहे.

हेही वाचा: Pakistan Plane Crash : पाकिस्तान एअरफोर्सचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; दोन वैमानिकांचा मृत्यू, Video व्हायरल

WhatsApp Image 2026 06 15 at 03.58.45

देशभरात १६०० हून अधिक शाखा

“स्वस्थ, समर्थ आणि संस्कारित भारत” या ध्येयाने कार्यरत असलेल्या भारत विकास परिषदेच्या देशभरात १६०० हून अधिक शाखा कार्यरत आहेत. विलेपार्ले शाखा ही त्यापैकी एक सक्रिय शाखा असून समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देत आहे.

शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव श्यामसुंदर जाजू आणि कोषाध्यक्षा सायली वेलणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहे. वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर शहाजीराजे महानगरपालिका इंग्रजी शाळेच्या प्रशासनाची जबाबदारी भारत विकास परिषदेकडे सोपविण्यात आली.

शिक्षण क्षेत्रातील दिग्गज अशोक ठुस्सू आणि उषा रैना, या शाळेचे दैनंदिन प्रशासन सांभाळतील, तसेच शै शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास याची जबाबदारी सांभाळणार आहेत.

या शाळेत ज्युनिअर केजीपासून इयत्ता सातवीपर्यंतचे सुमारे २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुसंख्य विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

WhatsApp Image 2026 06 15 at 03.58.44 1

हेही वाचा: Sanchita Ugale Suicide : ‘छावा’ फेम मराठमोळ्या अभिनेत्रीची आत्महत्या; ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतून घराघरांत पोहचलेला चेहरा

नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ

१५ जून २०२६ रोजी नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळा पुन्हा सुरू झाली. यानिमित्त आयोजित उद्घाटन समारंभात भारत विकास परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून, प्रभाग क्रमांक ८४ च्या नगरसेविका अंजली सामंत उपस्थित होत्या. अंजली सामंत यांनी स्वतः शिक्षिका म्हणून काम केले असून, त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारत विकास परिषदेला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी भारत विकास परिषद मुंबई-कोकण प्रांताचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, संघटन सचिव अभिनव खूर्दिया, विले पार्ले शाखेच्या महिला संयोजिका लीना रेडकर, संघटन सचिव प्रकाश राणे, संस्कार संयोजक श्रीनिवास घरत, प्रतिमा गायतोंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

वंचित विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून त्यांना सक्षम, सुसंस्कारित आणि जबाबदार नागरिक बनविण्याच्या दिशेने भारत विकास परिषदेने उचललेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.